ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात विरोधकांनी आणलेला अविश्वास प्रस्ताव आज संसदेत उपसभापती कासीम खान सुरी यांनी फेटाळला. सुरी यांनी अविश्वास प्रस्ताव फेटाळल्यानंतर इम्रान खान यांनी राष्ट्रपती आरिफ अल्वी यांच्याकडे पाकिस्तानची संसद बरखास्त करण्याची शिफारस केली आहे. राष्ट्रपतींनी संसद बरखास्त केल्यास पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा सार्वजनिक निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विरोधकांनी पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला होता. त्यामुळे खान सरकार अडचणीत होतं. सरकार पडणार आणि इम्रान खान यांना अटक होणार अशी दाट शक्मयता निर्माण झाली होती. मात्र, मंत्री चौधरी फवाद हुसेन यांनी खान यांचा प्लॅन बी वापरला. ‘अविश्वास प्रस्ताव लोकशाहीनं दिलेला अधिकार आहे. संविधानाच्या 95 व्या कलमानुसार अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आला. मात्र दुर्दैवानं त्याचा वापर परदेशातील सरकारकडून सत्ता परिवर्तनासाठी होत असल्याचं हुसेन यांनी संसदेत सांगितलं.’ त्यानंतर सभागृहाच्या उपसभापतींनी इम्रान खान सरकारविरोधातील प्रस्ताव फेटाळून लावला.
संसदेचं कामकाज आता 25 एप्रिलला होणार आहे. दरम्यान, या घटनाक्रमानंतर इम्रान खान यांनी संसद बरखास्त करण्याची शिफारस राष्ट्रपतींकडे केली आहे.