उपचारातील रूग्ण 21 हजाराकडे
प्रतिनिधी/ सातारा
राज्यातील काही जिल्हय़ांमध्ये रूग्णसंख्या आटोक्यात येत असली सातारा जिल्हय़ात कोरोनाचे थैमान सुरू आहे. मार्च महिन्यापासून रूग्णसंख्या वाढती असून सक्रीय रूग्णांचा आकडा 21 हजाराकडे गेला आहे. ही रूग्णसंख्या राज्यात पाचव्या क्रमांकाची आहे. विशेष म्हणजे सातारा शहर व तालुका जिल्हय़ाचा हॉटस्पॉट झाला असून येथील उपाययोजना कमी पडत आहेत. बुधवारी चोवीस तासात तब्बल 58 जणांचा बळी गेल्याने थरकाप उडाला आहे. रूग्ण वाढत असताना मृत्यूही वाढत चालल्याने चिंतेचे वातावरण आहे.
दरम्यान, बुधवारी सकाळी आलेल्या अहवालात 2376 रूग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. कालच्या आकडय़ापेक्षा हा आकडा कमी आहे. सायंकाळी कोरोनावर मात करणाऱया 2032 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेले काही दिवस लसीकरण थांबले होते. बुधवारी काही प्रमाणात लस उपलब्ध झाल्याने लसीकरण सुरू झाले आहे.
चार महापालिकांनंतर सातारा
एप्रिल महिन्याच्या प्रारंभाला 3 हजार असणारे सक्रीय रूग्णांचे प्रमाण आता 21 हजाराकडे आले आहे. एका महिन्यात रूग्णसंख्या प्रचंड वाढली आहे. याचा ताण जिल्हय़ाच्या सर्व आरोग्य सेवेवर पडला आहे. बेड मिळत नसल्याने नातेवाईकांचे हाल होत आहेत. परवापेक्षा कालचा साताऱयाचा आकडा कमी असला तरी दुर्दैवाने महाराष्ट्रात आज सातारा जिल्हा उपचारार्थ रुग्ण संख्येमध्ये सातारा पाचव्या स्थानी आला आहे. आज सकाळच्या माहितीनुसार पुणे 1,09,740, मुंबई 56,465, ठाणे 45,516, नाशिक 45,605 व सातारा 20,964 असे सक्रीय रूग्णांचे प्रमाण आहे. यानुसार सातारा राज्यात पाचव्या स्थानावर आहे. अधिक काळजी घेत रायगड, अहमदनगर, औरंगाबाद, सोलापूर हे मोठे आकडे येणारे जिल्हे नियंत्रणात येऊ लागले आहेत.
हॉटस्पॉटकडे लक्ष द्या
ऑक्टोबर महिन्यापासून सातारा शहर व तालुक्यात रूग्णवाढ सुरू आहे. दुसरी लाट सुरू झाल्यापासून या तालुक्यात सातत्याने रूग्ण वाढत आहेत. प्रथम क्रमाकांचे मृत्यू आणि रूग्णसंख्या असतानाही प्रशासनाच्या उपाययोजना अपुऱया पडत आहेत. साताऱयात जिल्हय़ाचे नियोजन अधिकारी करत असले तरी तालुका व् शहराकडे लक्ष द्यावे, अशी मागणी सातारकर करत आहेत.
बुधवारी सकाळी आलेल्या अहवालात 2376 रूग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. यात सातारा शहर व तालुक्यात 409 रूग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. हा आकडा सर्वाधिक आहे. तालुकानिहाय कोरोनाबाधितांची संख्या तर आजअखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे- जावली 128 (5442), कराड 310 (17006), खंडाळा 183 (7058), खटाव 215 (9753), कोरेगाव 193 (9616), माण 151 (7288), महाबळेश्वर 27 (3432), पाटण 153 (4683), फलटण 410 (14783), सातारा 409 (25990), वाई 175 (8584 ) व इतर 22 (607) असे आजअखेर एकूण 114242 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
कराड तालुक्यात 17 जणांचा मृत्यू
गेल्या चोवीस तासात जिल्हय़ात 58 जणांचा मृत्यू झाला आहे. हा आजवरचा उच्चांकी आकडा असून यात कराड तालुक्यात तब्बल 17 मृत्यूंची नोंद झाली आहे. कराड तालुक्यात इतक्या मोठय़ा संख्येने मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ आहे. आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आजअखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे- जावली 0 (106), कराड 17 (469), खंडाळा 3 (88), खटाव 5 (278), कोरेगाव 5 (249), माण 4 (151), महाबळेश्वर 0 (34), पाटण 3 (123), फलटण 0 (194), सातारा 12 (793), वाई 9 (215) व इतर 0, असे आजअखेर जिह्यामध्ये एकूण 2700 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
2032 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज
जिह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 2032 नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.