प्रतिनिधी/ फोंडा
वाडीवाडा-कुंडई येथे सख्ख्या भावानेच आपल्या लहान भावाचा निर्घुणपणे खून केल्याची घटना काल मंगळवारी रात्री घडली. प्रभाकर गुरुदास नाईक (वय 40) असे मयत तरुणाचे नाव तर सागर गुरुदास नाईक असे संशयित आरोपीचे नाव आहे. या घटनेमुळे कुंडई भागात खळबळ माजली आहे. संशयित सागर याने नऊ वर्षापूर्वी आपला मोठा भाऊ रत्नाकर नाईक याचा अशाच प्रकारे खून केला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी प्रभाकर व सागर या दोन्ही भावांत कडाक्याचे भांडण झाले. यावेळी घरातील काही वस्तू एकमेकांवर फेकून मारण्यात आल्या. या झटापटीत प्रभाकर याचा नेमका मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. फोंडा पोलीस निरीक्षक मोहन गावडे यांच्या उपस्थितीत रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी पंचनामा सुरु होता. उपनिरीक्षक नेल्सन अल्बुकर्क यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपास कार्य हाती घेतले आहे.
जून 2012 मध्ये मोठय़ा भावाचा खून
संशयित सागर याने यापूर्वी जून 2012 मध्ये आपल्या मोठय़ा भावाचा अशाच प्रकारे खून केला होता. या गुन्हय़ाबद्दल त्याला शिक्षाही झाली होती. काहीकाळ तुरुंवास भोगून चार वर्षापूर्वी तो सुटला हेता. वैद्यकीय कारणास्तव सशर्त अटीवर त्याची सुटका करण्यात आली होती. मात्र शिक्षा भोगल्यानंतर सुधारण्याऐवजी त्याच्यातील अमानुष वृत्तीचे दर्शन पुन्हा एकदा आपल्या लहान भावाच्या खुनातून घडले.
संशयित सागर याला पत्नी व तीन मुले आहेत. त्याच्या तुरुंगवासाच्या काळात व त्यानंतरही त्याचा लहान भाऊ प्रभाकर हा त्याच्या मुलांची काळजी घ्यायचा. त्यांना हवे नको ते पहायचा, असे काही स्थानिकांनी सांगितले.
मयत प्रभाकर हा अविवाहित असून स्वभावाने साधा व कष्टाळू होता. गावातच लहान मोठी रोजंदारीची कामे करून आपला उदरनिर्वाह चालवायचा. वाडय़ावर तो आबुली या नावाने ओळखला जायचा. त्याचा अशा प्रकारे सख्ख्या भावाच्या हातून बळी गेल्याने ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली आहे.