ख्रिसमस सण अवघ्या 10 ते 12 दिवसांवर : साहित्याने बाजारपेठा सजल्या
प्रतिनिधी/ बेळगाव
रंगीबेरंगी चांदण्या, जिंगलबेल, चमकणारे ट्री, विविध मुखवटे, सांताक्लॉजचा स्टॅचू अशा साहित्याने बाजारपेठा सजल्या असून ही सज्जता नाताळ सणासाठीची आहे. ख्रिस्ती बांधवांचा ख्रिसमस हा सण अवघ्या 10 ते 12 दिवसांवर येऊन ठेपला असून या निमित्ताने आवश्यक साहित्यांनी बाजारपेठा बहरल्या आहेत. ख्रिसमस सणाच्यानिमित्ताने होणाऱया व्यापाराची तयारी पूर्ण झाली आहे. बाजारपेठेतील रंगीबेरंगी चित्र पाहता ख्रिसमसची चाहूल लागली असून खरेदीची लगबग सुरू झाली आहे.
नवीन वर्षाच्या आगमनापूर्वी डिसेंबर महिना उजाडला की वेध लागतात ते ख्रिसमस सणाचे. 25 डिसेंबर रोजी ख्रिसमस साजरा होताच नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी सुरू होते. यामुळे सध्या बाजारपेठेत ख्रिसमस सणासाठी आवश्यक साहित्यांची रेलचेल असून खरेदीकडे कल वाढला आहे. कोरोनाच्या संकटात सण-समारंभ साजरे करण्यावर मर्यादा आल्या आहेत. सणांचा उत्साह मोठा असला तरी याचा परिणाम खरेदीवर झाला आहे. सालबादप्रमाणे व्यापार झाला नसल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. मात्र सध्या कोरोनाचा प्रसार कमी झाला असून यामुळे ख्रिस्ती बांधवांकडून या सणासाठी खरेदी होईल, अशी आशा व्यक्त होत आहे.
सध्या पांगूळ गल्ली, किर्लोस्कर रोड, खडेबाजार, मारुती गल्ली, गणपत गल्ली या भागातील स्टेशनरी दुकानांमध्ये ख्रिसमस सणासाठीचे जणू प्रदर्शनच भरले आहे. सांताक्लॉजच्या स्टॅचूपासून मोठमोठय़ा ख्रिसमस ट्री व त्यांना करण्यात आलेली विद्युत रोषणाई, जिंगलबेल, सांताक्लॉजची टोपी, एलईडी कॅम्प, प्रिंटेड कॅम्प, हेअर बँड, देखावे, सिरॅमिक बाहुल्या, चांदण्या, झालर, बॉल्स, रंगीबेरंगी मेणबत्त्या, म्युझिकल सांता, भेटवस्तू तसेच भेटकार्ड तसेच येशू ख्र्रिस्ताच्या जन्माचे देखावे सादर करण्यासाठी आवश्यक साहित्य बाजारात दिसून येत असून खरेदीला आता सुरुवात झाली असल्याचे मत व्यापारीवर्गातून व्यक्त होत आहे.
शाळा बंदचा व्यापाराला फटका : प्रसाद हुंदरे
ख्रिसमस सणाच्या निमित्ताने बाजारपेठ सज्ज झाली आहे. मात्र, शाळा बंदचा फटका व्यापाराला बसला आहे. देखावे, सांताचे कॅप, सांताचे मास्क, बेल व ख्रिसमस ट्री सजविण्यासाठी आवश्यक साहित्य दाखल झाले आहे. सणाला दहा दिवस बाकी असून खरेदी होईल, अशी आशा असल्याचे मत प्रसाद हुंदरे यांनी व्यक्त केले.
ख्रिसमसनिमित्त भेटकार्ड खरेदीला महत्त्व : संतोष सांबरेकर
ख्रिसमसच्या निमित्ताने भेटवस्तू व भेटकार्ड खरेदीला खूप महत्त्व असते. दरवर्षी मोठय़ा प्रमाणात मागणी असते. मात्र, सध्या कोरोनामुळे खरेदीवर परिणाम झाला आहे. भेटकार्ड 25 पासून 100 रु. पर्यंत असून दरवर्षीच्या तुलनेत शाळा नसल्याने मागणी 50 टक्क्यांनी घटण्याची शक्यता आहे, असे मत संतोष सांबरेकर यांनी व्यक्त केले.