हॉटेलांतील कचरा टाकल्याने परिसरात दुर्गंधी
प्रतिनिधी / मडगाव
मडगावातील शहरी भागात सडेकर लेननजीकच्या पॅसेजमध्ये मोठय़ा प्रमाणात कचरा पडून राहण्याचे प्रकार वाढले असल्याचे दिसून येत आहे. शहरी भाग असल्याने लोकांची वर्दळ या ठिकाणी असते. जवळच न्यू मार्केट परिसर असल्याने खरेदीसाठी आलेले लोक या पॅसेजचा वापर करत असतात.
मात्र अलीकडे पडून राहणाऱया कचऱयाचे प्रमाण जास्त राहत असल्याने ही सर्व पॅसेज त्याने व्यापली जाते. त्यामुळे लोकांना ये-जा करण्यासाठी जागा शिल्लक राहत नसल्याचे दिसून येते. या ठिकाणी बाजार परिसरातील जो कचरा टाकला जात असतो तो बहुतेक करून मिश्र स्वरूपातील असतो. त्यामुळे हा कचरा ओला व सुका असे वर्गीकरण करून उचलला जात असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली.
हॉटेलांतील ओला कचरा पालिकेकडून वेगळे वाहन पाठवून गोळा करण्यात येत असतो. मात्र लॉकडाऊनच्या काळात हॉटेल्स बंद होती. अलीकडेच ‘टेक-अवे’ सेवा हॉटेलांतून सुरू करण्यात आली असून हॉटेलांतील उचलला न जाणारा कचरा या पॅसेजमध्ये टाकण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरत असल्याच्या नजीकच्या दुकानदारांच्या तक्रारी आहेत.
हॉटेलांतील कचरा येथे टाकला जाणार नाही याची काळजी पालिकेने घ्यावी तसेच येथील पॅसेजमध्ये तासन्तास कचरा पडून राहणार नाही यासाठी आवश्यक पावले उचलावीत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.