माझी टिपणी अनुष्कावर अजिबात नाही
माझी टिपणी अनुष्कावर अजिबात नाहीसोशल मीडियावर वावटळ उठल्यानंतर अनुष्का शर्माने देखील इन्स्टाग्रामवर प्रदीर्घ संबोधित केल्याने व्यथित झालेल्या सुनील गावसकरांनी यावेळी काहीच कालावधीत तपशीलवार आपली बाजू मांडली. ‘ना मी विराट कोहलीच्या खराब प्रदर्शनाबद्दल अनुष्काला जबाबदार धरले, ना तिच्यावर कोणतीही अश्लील टिपणी केली’, असे सनी स्पष्टपणे म्हणाले. रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरचा संघ किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध लढला, त्यावेळी विराटचे प्रदर्शन अतिशय निराशाजनक ठरले. प्रारंभी त्याने पंजाबचा शतकवीर कर्णधार केएल राहुलला अनुक्रमे 83 व 89 धावांवर चक्क दोन जीवदाने दिली. शिवाय, विजयासाठी द्विशतकी आव्हान असताना फलंदाजीत त्याला केवळ 5 चेंडूत 1 धाव करता आली. विराट कोहली क्रीझवर असताना सनी असे म्हणत होते की, विराटला आपल्यात सुधारणा करणे नेहमी पसंत असते आणि त्याचा प्रयत्नही तोच असतो. अर्थात, लॉकडाऊन सुरु असताना सराव, मॅच प्रॅक्टिस बंद होते आणि कोहलीने फक्त अनुष्काच्या गोलंदाजीवर सराव केला. ते येथे पुरेसे ठरत नाही. गावसकर यावेळी हिंदीत समालोचन करत होते. पण, त्यांचा हा संदर्भ अनेकांना रुचला नाही आणि काही क्षणात सोशल मीडियावर या टिपणीवर प्रतिक्रियांचा अक्षरशः पाऊस सुरु झाला. काही जणांनी तर सनीना स्टार स्पोर्टस् समालोचन पॅनेलमधूनच काढून टाकावे, अशी मागणीही केली. गावसकरांनी मात्र जो अर्थ घेतला जात आहे, त्या अनुषंगाने आपण बोललोच नव्हतो, असे स्पष्ट केले. ‘सर्वप्रथम मी हे स्पष्ट करु इच्छितो की, मी अनुष्काला कुठेही दोष दिलेला नाही. व्हीडिओमध्ये ती विराटला गोलंदाजी करत होती, इतकेच मी म्हटले आहे. त्यावेळी देखील ते टेनिस चेंडूने खेळत असल्याचे चित्रित आहे. विराटच्या अपयशाबद्दल मी अनुष्काला कुठेही जबाबदार धरलेले नाही’, असे सनी म्हणाले. अश्लील टिपणी केली, असा आरोप सोशल मीडियावर केला गेला, ते आरोपही सनीने स्पष्टपणे फेटाळले. ‘प्रदीर्घ दौऱयादरम्यान खेळाडूंच्या पत्नींनी खेळाडूंसमवेत असावे, यासाठीच मी नेहमी प्रयत्न केले. कालच्या लढतीत समालोचन करताना आकाश व माझी चर्चा सुरु होती, त्यात लॉकडाऊनमध्ये सराव करणे अवघड होते, हाच दृष्टिकोन होता. पण, दुर्दैवाने त्याचा गैरअर्थ घेतला गेला आहे’, असे सनी शेवटी म्हणाले.