कन्नौजमधील विजयासाठी धडपड : असीम अरुण यांच्याकडे जबाबदारी
वृत्तसंस्था/ कानपूर
उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्याने राजकीय पक्षांनी विविध प्रकारचे डावपेच लढविण्यास सुरुवात केली आहे. भाजपने समाजवादी पक्षाला बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱया कनौजकरता विशेष तयारी केली आहे. पोलीस आयुक्त असीम अरुण यांनी स्वेच्छानिवृत्ती घेत भाजपचे सदस्यत्व स्वीकारले आहे. असीम अरा यांना कनौज ग्रामीण विधानसभा मतदारसंघात भाजपची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मोदी लाटेतही या मतदारसंघात कमळ फुलू शकले नव्हते.
आयपीएस असीम अरुण हे मूळचे कनौजचे रहिवासी आहेत. असीम यांचे वडिल श्रीराम अरुण हे उत्तरप्रदेशातील कर्तबगार आयपीएस अधिकारी होते. तर असीम यांची आई शशी अरुण या लेखिका होत्या.
कनौजमध्ये भाजपचा खासदार
कानपूर-बुंदेलखंड हा भाजपला बळ पुरविणारा महत्त्वाचा भाग आहे. भाजपने कानपूर-बुंदेलखंड जिंकण्यासह समाजवादी पक्षाचा बालेकिल्ला भेदण्याची तयारी चालविली आहे. अत्तराची नगरी कनौजला समाजवादी पक्षाचा बालेकिल्ला मानले जाते. कनौजमध्ये भाजपचा खासदार तसेच दोन आमदार आहेत.
भगवा फडकविला
भाजपने 2019 च्या लोकसभा निवडणुकीत कनौजमध्ये विजय मिळवून समाजवादी पक्षाला मोठा धक्का दिला होता. भाजपचे सुब्रत पाठक यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यांना पराभूत केले होते. भाजपने या मतदारसंघात 23 वर्षांनी विजय मिळविला होता. लोकसभा निवडणुकीत कानपूर-बुंदेलखंडमधील 10 पैकी 10 ठिकाणी भाजपने कमळ फुलविले होते.
कनौज ग्रामीण मतदारसंघ
2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने कनौजच्या तीन पैकी 2 मतदारसंघांमध्ये विजय मिळविला होता. तिर्वां मतदारसंघातून भाजपचे कैलास राजपूतर छिबरामऊ मतदारसंघातून भाजपच्या अर्चना पांडे यांनी यश मिळविले होते. पण कनौज ग्रामीण मतदारसंघात कमळ फुलविण्यास अपयश आले होते. सपचे दिग्गज नेते अनिल दोहरे यांनी येथून विजय प्राप्त केला होता. या मतदारसंघात मागील 20 वर्षांपासून समाजवादी पक्षाचे वर्चस्व आहे.
भाजपकडून जोरदार तयारी
भाजपने कनौज ग्रामीण मतदारसंघासाठी जोरदार तयारी केली आहे. या मतदारसंघासाठी भाजपला प्रामाणिक प्रतिमेचा आणि प्रभावी चेहऱयाचा शोध होता. कानपूर पोलीस आयुक्त असीम अरुण यांना या मतदारसंघात उभे करण्याची तयारी भाजप करत आहे. सप आमदार अनिल दोहरे हे जाटव समाजाशी संबंधित आहेत.
जातीय गणित कनौज ग्रामीण मतदारसंघात अनुसूचित जातीचे सुमारे 1 लाख मतदार आहेत. तर मुस्लीम मतदार 65 हजार आहेत. ब्राह्मण तसेच यादव मतदारसंघांची संख्या प्रत्येकी 45 हजार आहे. लोधी समाजाचे 30 हजार तर कुशवाह मतदारांची संख्या 40 हजार आहे.