आर. एल. लॉ कॉलेजमध्ये वार्षिक बक्षीस वितरण समारंभ
प्रतिनिधी /बेळगाव
केएलएस संस्थेच्या आर. एल. लॉ कॉलेजचा वार्षिक बक्षीस वितरण समारंभ व अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ नुकताच पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हासत्र न्यायाधीश मंजुनाथ भट उपस्थित होते. यावेळी पद्मविभूषण के. के. वेणुगोपाल यांनी आपले वडील एम. के. नंबियार यांच्या स्मरणार्थ ठेवलेले सुवर्णपदक कृष्णा बांदेकर याला देण्यात आले. कृष्णा या विद्यार्थ्याने कॉन्स्टिटय़ूशनल लॉ या विषयात सर्वात जास्त गुण मिळविले आहेत.
यावेळी न्या. मंजुनाथ भट म्हणाले, तरुण वकिलांनी गरजू आणि गरीब अशिलांना प्राधान्य दिले पाहिजे. ज्येष्ट वकील न्यायालयात कसे काम करतात, हे त्यांनी जाणून घेतले पाहिजे. आज कायदा प्राध्यापकांची आवश्यकता आहे. त्यामुळे त्याचाही तुम्ही विचार करावा. तुमच्या ध्येयावरती लक्ष ठेवा. आज समाजाला उत्तम वकील व न्यायाधीशांची नितांत गरज आहे, असेही ते म्हणाले.
केएलएसचे सचिव विवेक कुलकर्णी यांनी प्रथम विद्येचा म्हणजेच ज्ञानाचा उपयोग समाजासाठी करा. लक्ष्मी तुमच्याकडे आपोआप येईल. मात्र फक्त पैसा हे उद्दिष्ट ठेवून या पेशात येऊ नका, असे सांगितले. कार्यकारी मंडळाचे चेअरमन एस. व्ही. गणाचारी यांनी अध्यक्ष समारोप करताना तुमची पहिली चार वर्षे वकिलीचे कौशल्य आत्मसात करण्यासाठी खर्च करा. दुसऱयांबरोबर स्वतःची तुलना करू नका, असे सांगितले. यावेळी श्रेया उत्तुरे, विद्यार्थी प्रतिनिधी बसवप्रसाद संपकाळ, मालविका थोरात या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.
प्राचार्य डॉ. ए. एच. हवालदार यांनी स्वागत केले. प्रा. पी. ए. यजुर्वेदी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. मुलांच्या विभागात सुहास हुद्दार यांनी तर मुलींमध्ये उज्ज्वला हवालदार यांनी सर्वसाधारण अजिंक्मयपद पटकाविले. प्रियांका राठी यांनी सूत्रसंचालन केले. स्नेहा कुलकर्णी यांनी स्वागतगीत सादर केले. विद्यार्थिनी प्रतिनिधी पूजा बडकुंद्री यांनी आभार मानले.