नर्सिंग विद्यार्थ्यांचा आरोप : जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
आरोग्य विभागाने बीएससी नर्सिंग परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना कम्युनिटी हेल्थ ऑफिसर म्हणून नियुक्त करण्यासाठी परीक्षा घेतली होती. या परीक्षेचा ऑनलाईन निकाल चुकीच्या पद्धतीने अपलोड करण्यात आला आहे, असा आरोप करत परीक्षा दिलेल्या नर्सिंग विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले.
आरोग्य विभागातर्फे कम्युनिटी हेल्थ ऑफिसर (सीएचओ) या पदासाठी परीक्षा घेतली होती. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी 70 ते 80 टक्के गुण घेतले होते. त्यांचे या यादीमध्ये नावच नाही. तर 45 ते 50 टक्के गुण घेतलेल्या विद्यार्थ्यांची नावे दाखल करण्यात आली आणि त्या विद्यार्थ्यांची यादी ऑनलाईनवर अपलोड करण्यात आली. यामुळे अधिक गुण घेतलेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय झाला असून तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.
यावेळी आप्पासाहेब मुलतानी, बसनगौडा पाटील, सुधाराणी मठपती, शीला हेमगौड, लक्ष्मी सुनहळ्ळी, काशिबाई कंबली, शंकरम्मा अष्टगी, मारुती नाईक यांच्यासह विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.