1 कोटी युवक प्रशिक्षीत – 18 लाख जणांना रोजगार – 2 लाखाहून अधिक जणांनी स्वतःचा उद्योग
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
स्किल इंडिया मिशन अंतर्गत जानेवारी 2021 पर्यंत एक कोटीहून अधिक युवकांना यशस्वीपणे प्रशिक्षित करण्यात आले असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले. कौशल्य विकास मंत्री महेंद्रनाथ पांडे यांनी यासंबंधीची माहिती नुकतीच दिली.
सरकारने प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत 2016 ते 2020 पर्यंत एक कोटी युवकांना प्रशिक्षित करायचे उद्दिष्ट ठेवले होते. सदरचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात सरकारला यश आले आहे. छोटय़ा कालावधीचे प्रशिक्षण देणे आणि बेरोजगार युवकांना जे प्रशिक्षित झालेत त्यांना मान्यता देणे यावर सरकारने भर दिला आहे. कौशल्य विकास प्रशिक्षण अंतर्गत छोटय़ा कालावधीसाठी 36 लाख उमेदवारांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. ज्यापैकी 18 लाख 95 हजार उमेदवारांना रोजगार प्राप्त झाला आहे. यापैकी 2 लाख 77 हजार जणांनी स्वतःचा उद्योग सुरू केला असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. यातील 15.83 लाख जणांना वेतनाची नोकरी मिळाली आहे. योजनेच्या तिसऱया टप्प्याअंतर्गत व्यापारी वर्षात 8 लाख युवकांना प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
औद्योगिक विकास प्रशिक्षणासाठी नॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर एंट्रप्रिनरशिप अँड स्मॉल बिझनेस डेव्हलपमेंट या संस्थेची मदत घेण्यात आली आहे. याअंतर्गत 46 हजार 690 एंट्रप्रिनरशिप डेव्हलपमेंट ट्रेनिंग कार्यक्रमांतर्गत 12.35 लाख युवकांना प्रशिक्षण देण्यात आलंय. याशिवाय मंत्रालयाअंतर्गत येणाऱया प्रशिक्षण महासंचालनालयातर्फे एक वर्ष व अनेक वर्ष कालावधीचे अनेक व्यावसायिक व कौशल्य विकास कोर्सेस सुरु केले आहेत. आयटीआयच्या सहाय्याने हे कोर्सेस घेतले जात आहेत.