प्रतिनिधी/ बेळगाव
महापालिकेच्या मालकीच्या व्यापारी संकुलातील गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी लिलाव प्रक्रिया सुरू आहे. सरदार्स ग्राऊंड येथे क्रीडा संकुल उभारण्यात आले असून या ठिकाणी असलेल्या गाळय़ांच्या माध्यमातून प्रथमच महापालिकेला महसूल मिळणार आहे. याकरिता शुक्रवार दि. 16 रोजी सकाळी 11 वा. सरदार्स ग्राऊंड मैदानावरील संकुलाच्या आवारात बोली लागणार आहे.
महापालिकेचा महसूल वाढविण्यासाठी विविध ठिकाणी व्यापारी संकुल उभारण्यात आले आहेत. यंदा यामध्ये सरदार्स हायस्कूलच्या मैदानावरील गाळय़ांची भर पडली आहे. सदर मैदानावर 100 कोटी अनुदानातून क्रीडा संकुल आणि गॅलरी उभारण्यात आली आहे. या ठिकाणी चार गाळे बांधण्यात आले आहेत. इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन वर्ष उलटले तरी येथील गाळे भाडेतत्त्वावर देण्यात आले नव्हते. या परिसरातील देखभाल व्यवस्थित होत नसल्याने नागरिकांच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे येथील स्वच्छतेबरोबरच गाळे भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
शुक्रवार दि. 16 रोजी सकाळी 11 वा. गाळय़ांच्या आवारातच लिलाव प्रक्रिया होणार आहे. मागील आठवडय़ात फिश मार्केट व कोनवाळ गल्ली मटण मार्केटच्या गाळय़ांचा लिलाव महापालिका कार्यालयातच आयोजित केला होता. पण सरदार्स मैदानावरील गाळे प्रथमच भाडेतत्त्वावर देण्यात येत असल्याने त्याच ठिकाणी लिलाव प्रक्रिया आयोजिली आहे. सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत लिलावात भाग घेण्यासाठी 50 हजार रुपये भरून नोंदणी करावी लागणार आहे. या ठिकाणी चार गाळे असून प्रत्येकी 1 लाख रुपये अनामत रक्कम आणि पाच हजार शंभर रुपये प्रति महिना भाडे महानगरपालिकेने निश्चित केले आहे. त्यावर बोली लागणार आहे. कॉलेज रोड हा मुख्य रस्ता म्हणून ओळखला जातो. परिसरात विविध कॉलेज, शाळा, सरकारी कार्यालये असल्याने हा परिसर नेहमी गजबजलेला असतो. त्यामुळे या गाळय़ांना मागणी वाढण्याची शक्मयता असल्याने बोलीची रक्कम वाढेल, अशी अपेक्षा महापालिकेचे अधिकारी व्यक्त करीत आहेत.