वृत्तसंस्था/ लिन्कन (न्यूझीलंड)
आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा मार्च महिन्यात न्यूझीलंडमध्ये भरविली जाणार आहे. या स्पर्धेपूर्वी येथे सोमवारी खेळविण्यात आलेल्या पहिल्या सरावाच्या सामन्यात इंग्लंडच्या महिला संघाने बांगलादेशचा 109 धावांनी दणदणीत पराभव केला. इंग्लंडच्या नॅट स्किव्हेरने शानदार शतक (108) झळकविले.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने 50 षटकांत 9 बाद 310 धावा जमविल्या. स्किव्हेरने 101 चेंडूत 108 धावा झळकविल्या. इंग्लंडच्या लॉरेन हिल आणि बेमाँट या सलामीच्या जोडीने 81 धावांची भागिदारी केली. हिलने 43 चेंडूत 55 धावा जमविल्या. नाईटने 27 धावांचे योगदान दिले. इंग्लंड संघातील वेट आणि डंक्ले या दोन फलंदाज पाठोपाठ बाद झाल्या. स्किव्हेरने आपले शतक 97 चेंडूत झळकविले. लँबने 28 धावा जमविल्या. बांगलादेशतर्फे नाहिदा अख्तरने 49 धावांत 3 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना बांगलादेशचा डाव 201 धावांत आटोपला. बांगलादेश संघातील शर्मीन अख्तरने 137 चेंडूत 81 धावा जमविल्या. इंग्लंडच्या स्किव्हेरने 12 धावांत 2 गडी बाद केले. क्रॉसने 22 धावांत 1 बळी मिळविला.
इंग्लंड 50 षटकांत 9 बाद 310 (स्किव्हेर 108, हिल 55, नाईट 27, लँब 28 नाहिदा अख्तर 3-49), बांगलादेश सर्वबाद 201 (शर्मीन अख्तर 81, स्किव्हेर 2-12).