प्रतिनिधी/ मडगाव
कोरोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीचे गांभीर्य ओळखून सरकारने मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील सर्वपक्षीय राज्य सल्लागार समितीची स्थापना करावी, अशी मागणी गोवा फॉरवर्डने केली आहे. सदर समितीने याआधीच अस्तित्वात आलेल्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील राज्य कार्यकारी समितीशी समन्वय साधून कार्यरत राहावे, असे पक्षाचे अध्यक्ष फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी म्हटले आहे.
असे पाऊल उचलल्याने पक्षपातीपणा आणि राजकारण होत असल्याचे जे आरोप करण्यात येत आहेत ते मिटतील आणि लोकांच्या मनातील शंका दूर होऊन विश्वासाचे वातावरण निर्माण होईल, असे पक्षाने म्हटले आहे. जरी मुख्यमंत्र्यांनी अनेक आश्वासने दिलेली असली, तरी गोवा आरोग्यविषयक आणीबाणीला तोंड देण्यास सक्षम आहे का असा प्रश्न उपस्थित हेतो. संकटाचे गांभीर्य आणि मागील काही दिवसांत सार्वजनिक आरोग्य व लोकांचा उदरनिर्वाह याबाबतीत जे काही पाहायला मिळाले आहे तसेच ज्या प्रकारचे नेतृत्व अनुभवायला मिळत आहे ते पाहता ही सर्वपक्षीय सल्लागार समिती तत्काळ स्थापन करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे, असे गोवा फॉरवर्डने म्हटले आहे.