सहा नगाला 3100 ते 3700 रुपये दर
बेळगाव प्रतिनिधी
यंदा बेळगावकरांना सर्वप्रथम कोकणच्या हापूसची चव चाखण्याची संधी लाभली आहे. जगदीश गावकर आणि संदीप लोके या मालवणच्या शेतकऱयांनी आंबा उपलब्ध करून दिला असून सहा नगाला 3100 ते 3700 रुपये असा दर आहे. शहरातील एम. बी. देसाई ऍण्ड सन्सतर्फे पहिला लिलाव करण्यात आला. त्यामुळे बेळगावकरांना सर्वप्रथम हापूस चाखण्याची संधी मिळाली.
एप्रिल महिन्यात मोठय़ा प्रमाणात येणारा हापूस आंबा सध्या जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ातच शहरात दाखल झाला आहे. मुंबईपेक्षा सर्वात आधी बेळगावात हापूस आंबा दाखल झाल्याने खवय्यांना हापूसची चव चाखता येत आहे. सुरुवातीला हापूसचे दर जरी चढे असले तरी खवय्ये मात्र जिभेचे चोचले पुरविण्यासाठी हापूस आंब्याची खरेदी करत आहेत.
सुरुवातीला हापूसची आवक कमी असली तरी येथील एम. बी. देसाई सन्सचे नितीन आणि संदीप देसाई यांना पहिला मान मिळाला आहे. तसेच किशन रजपूत, सुहास पै, नूर हंचनमनी, शकील पठाण, खानजादे आणि अशोक बजंत्री पहिले खरेदीदार ठरले आहेत.
येत्या काही दिवसात हळुवारपणे हापूसची आवक वाढत राहणार असून थंडीमुळे आंबा पिकण्यात अडथळे निर्माण होत आहेत. मात्र उन्हाळय़ाला सुरुवात होताच आंब्याची आवक बाजारात मोठय़ा प्रमाणात वाढणार असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.