वृत्तसंस्था / दुबई
भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीची गेल्या दशकातील सर्वोत्तम वनडे व टी-20 संघांचा कर्णधार म्हणून आयसीसीने निवड केली आहे. त्याचप्रमाणे भारतीय संघाचा विद्यमान कर्णधार विराट कोहलीची गेल्या दशकातील आयसीसीच्या सर्वोत्तम कसोटी संघाचा कर्णधार म्हणून निवड केली आहे.
आयसीसीच्या वनडे आणि टी-20 संघांत भारतीय क्रिकेटपटूंनी आपले वर्चस्व राखले आहे. क्रिकेटच्या या दोन्ही संघात भारताच्या तीन किंवा चार खेळाडूंनी स्थान मिळविले आहे. दरम्यान कसोटी संघात इंग्लंडच्या चार क्रिकेटपटूंना स्थान मिळाले आहे. या वर्षांच्या प्रारंभी 39 वर्षीय धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला होता. दशकामधील वनडे संघातील तीन क्रिकेटपटूंमध्ये धोनीसह रोहित शर्मा व विराट कोहली यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे टी-20 संघातही धोनीसह रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रित बुमराह यांना स्थान मिळाले आहे. दशकातील सर्वोत्तम संघ निवडण्यासाठी घेण्यात आलेल्या मतदानात तिन्ही संघात निवड होणारा विराट कोहली हा एकमेव क्रिकेटपटू आहे.
सोमवारी व्हर्च्युअल पुरस्कार वितरण होणार असून त्याआधी आयसीसीने दशकातील सर्वोत्तम पुरूष आणि महिला संघांची निवड जाहीर केली आहे. याशिवाय विविध प्रकारातील सर्वोत्तम खेळाडूंची निवडही सोमवारी जाहीर केली जाणार आहे. दशकातील सर्वोत्तम कसोटी संघामध्ये कोहली, रविचंद्रन अश्विनचा तसेच इंग्लंडचे अलिस्टर कूक, स्टोक्स, ब्रॉड, अँडरसन, ऑस्ट्रेलियाचे स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, न्यूझीलंडचा केन विल्यम्सन, लंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा आणि दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज स्टीन यांचा समावेश आहे.
दशकातील वनडे संघामध्ये भारतीय क्रिकेटपटूंचा समावेश इतर देशांच्या तुलनेत अधिक आहे. या संघामध्ये भारताचे चार, ऑस्ट्रेलियाचे वॉर्नर आणि स्टार्क, दक्षिण आफ्रिकेचे डिव्हिलीयर्स आणि इम्रान ताहीर, इंग्लंडचा बेन स्टोक्स, न्यूझीलंडचा बोल्ट, बांगलादेशचा अष्टपैलू शकीब अल हसन, लंकेचा मलिंगा यांचा समावेश आहे.
आयसीसीच्या गेल्या दशकातील सर्वोत्तम टी-20 संघात भारताचे चार, विंडीजचे गेल आणि पोलार्ड, ऑस्ट्रेलियाचे फेंच आणि मॅक्सवेल, दक्षिण आफ्रिकेचा डिव्हिलीयर्स, लंकेचा मलिंगा आणि अफगाणचा रशीद खान यांचा समावेश आहे.
दशकातील महिलां टी-20 संघामध्ये भारताच्या हरमनप्रित कौर आणि पुनम यादव तसेच सर्वोत्तम वनडे संघात भारताच्या मिताली राज आणि झुलन गोस्वामी यांना स्थान मिळाले आहे.
दशकातील क्रिकेटच्या विविध प्रकारातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंची आणि संघांची निवड करण्यासाठी आयसीसीने संपूर्ण जगामध्ये 1.5 दशलक्ष शौकिनांची मते आजमावली. आयसीसीच्या गेल्या दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंच्या निवडीसाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती.
दशकातील सर्वोत्तम कसोटी संघ- कूक, वॉर्नर, विल्यम्सन, विराट कोहली (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, संगकारा, स्टोक्स, रविचंद्रन अश्विन, स्टीन, ब्रॉड, अँडरसन.
दशकातील सर्वोत्तम वनडे संघ- रोहित शर्मा, वॉर्नर, कोहली, डीव्हिलियर्स, शकीब अल हसन, महेंद्रसिंग धोनी (कर्णधार) स्टोक्स, स्टार्क, बोल्ट, इम्रान ताहीर आणि मलिंगा.
दशकातील सर्वोत्तम टी-20 संघ- रोहित शर्मा, गेल, फिंच, कोहली, डीव्हिलियर्स, मॅक्सवेल, धोनी, पोलार्ड, रशीद खान, बुमराह आणि मलिंगा.
दशकातील सर्वोत्तम महिला वनडे संघ-ऍलीसा हिली, बेट्स, मिताली राज, लॅनिंग (कर्णधार), स्टिफेनी टेलर, सारा टेलर, इलेसी पेरी, निकर्क, कॅप, झुलन गोस्वामी, अनिशा मोहम्मद.
दशकातील सर्वोत्तम महिला टी-20 संघ- ऍलीसा हिली, डिव्हाइन, बेट्स, लॅनिंग (कर्णधार), हरमनप्रित कौर, स्टिफेनी टेलर, डॉटिन, पेरी, श्रबसोल, स्कूट, पुनम यादव.