कोरोना महामारीमुळे निर्णय – ऑनलाईन दर्शन घेता येणार
वृत्तसंस्था /जम्मू
यंदा देखील पवित्र अमरनाथ यात्रा होणार नाही. कोरोनामुळे ही यात्रा रद्द करण्यात आली आहे. ही यात्रा 28 जून रोजी सुरू होत 22 ऑगस्टपर्यंत चालणार होती. 1 एप्रिलपासून यात्रेसाठी आगाऊ नोंदणीही करविली जात होती. पण तेव्हाच देशात कोरोनाची दुसरी लाट उद्भवली होती. पण भाविक बाबा बर्फानीचे ऑनलाईन दर्शन करू शकणार आहेत अशी माहिती जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी दिली आहे.
कोरोनामुळे मागील वर्षी देखील ही यात्रा रद्द करण्यात आली होती. याचबरोबर 2019 मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 हद्दपार करण्यात आल्यावरही सुरक्षेच्या कारणास्तव यात्रा मध्येच रोखण्यात आली होती. यामुळे अनेक भाविकांना बाबा बर्फानीचे दर्शन घेता आले नव्हते.
अमरनाथ यात्रा सर्वात कठिण यात्रांपैकी एक आहे. काश्मीरच्या बालटाल आणि पहलगाम येथून ही यात्रा सुरू हेते. ही तीर्थक्षेत्र अनंतनाग जिल्हय़ात आहे. अमरनाथच्या गुहेत बर्फाने नैसर्गिक शिवलिंग तयार होते. येथे पोहोचण्याचा मार्ग अत्यंत आव्हानात्मक आहे. प्रतिकूल हवामान, भूस्खलन अशा अनेक समस्या असूनही लाखो भाविक तेथे पोहोचत असतात.