दिवाळीच्या खरेदीसाठी पैसे काढण्यास नागरिकांची गर्दी
प्रतिनिधी / बेळगाव
दिवाळीची सुटी यावर्षी साप्ताहिक सुटीला जोडून आली आहे. त्यामुळे आता थेट मंगळवारीच बँका सुरू होणार आहेत. त्यापूर्वी दिवाळीच्या खरेदीसाठी शुक्रवारी नागरिकांनी बँकामधून रक्कम काढण्यासाठी गर्दी केली होती. दिवाळीला वाहने, टीव्ही, फ्रीज, सोने, घरे खरेदी केली जात असल्याने त्यासाठी रक्कम आधीच काढून ठेवण्यात येत होती. शनिवारी लक्ष्मीपूजन व दुसरा शनिवार असल्याने बँकांना सुटी राहणार आहे. रविवारी साप्ताहिक सुटी तर सोमवारी दीपावली पाडवा असल्याने शासकीय कार्यालये व बँकांना सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे शुक्रवारनंतर थेट मंगळवारीच बँका उघडणार आहे. पाडव्यादिवशी होणाऱया खरेदीसाठी नागरिक आधीच रक्कम काढून ठेवत आहेत. पाडव्याच्या शुभमुहूर्तावर मोठय़ा प्रमाणात खरेदी करण्यात येते. गृह व वाहन खरेदीसाठी बँकामधून कर्ज घेण्यात येते. त्यासाठी मागील दोन दिवसांपासून खरेदीदारांची कर्जाच्या कागदपत्राची जमवाजमव सुरू आहे. त्यामुळे शुक्रवारीही बँकांमध्ये कर्जाच्या कागदपत्रांची पूर्तता करणाऱयांची संख्या जास्त असल्याचे दिसून आले. एटीएममध्ये खडखडाट शहराच्या मध्यवर्ती भागातील किर्लोस्कर रोड, मारूती गल्ली, गणपत गल्ली या भागातील बऱयाच एटीएममध्ये खडखडाट आहे. ऐन सणासुदीच्या काळात एटीएममध्ये रक्कम नसल्याने नागरिकांना रक्कम मिळण्यासाठी फिरावे लागत होते. त्यामुळे नाराजीचा सूर उमटत होता.