कोलकाता
आगामी आयपीएल स्पर्धेतील सलामी लढतीत इंग्लंड व ऑस्ट्रेलियाचे खेळाडू उपलब्ध होणार का, याबद्दल अद्याप साशंकता कायम असल्याचे किंग्स इलेव्हन पंजाबचे सीईओ सतीश मेनन यांनी सोमवारी स्पष्ट केले. इंग्लंड व ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या वनडे मालिका सुरु असून संयुक्त अरब अमिरातीत दाखल झाल्यानंतर क्वारन्टाईन व्हावे लागणार असल्याने या खेळाडूंचा सहभाग अनिश्चित आहे. केकेआरचे सर्वेसर्वा वेंकी म्हैसूर यांनी यापूर्वी सदर खेळाडू पहिल्या लढतीसाठी उपलब्ध असतील, असे म्हटले होते.
इंग्लंड व ऑस्ट्रेलियाचे खेळाडू सध्या जैवसुरक्षित वातावरणातच असल्याने त्यांना संयुक्त अरब अमिरातीत क्वारन्टाईन व्हावे लागणार नाही, असा दावा त्यावेळी म्हैसूर यांनी केला होता. पण, पंजाब प्रँचायझीचे सीईओ सतीश मेनन यांना त्याची खात्री वाटत नाही. केएल राहुलच्या नेतृत्वाखालील पंजाब संघात ऑस्ट्रेलियन फलंदाज ग्लेन मॅक्सवेल व इंग्लिश गोलंदाज ख्रिस जॉर्डन यांचा समावेश आहे. पंजाबचा संघ या आयपीएल हंगामातील पहिली लढत दि. 20 सप्टेंबर रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध दुबईत खेळणार आहे. पंजाब संघाला आजवर एकही आयपीएल जिंकता आलेली नाही. पण, या हंगामात आपला संघ जेतेपदाचा दुष्काळ निश्चितपणाने संपुष्टात आणेल, असा विश्वास मेनन यांनी व्यक्त केला आहे.