आयपीएल साखळी लढतः 18 चेंडूत नाबाद 36 धावा, राजस्थानचा दिल्लीविरुद्ध 3 गडी राखून रोमांचक विजय, मिलरचे अर्धशतक, सामनावीर उनादकट चमकला
वृत्तसंस्था / मुंबई
यंदाच्या आयपीएल लिलावात विक्रमी 16.25 कोटी रुपयांची सर्वोच्च बोली लागलेल्या ख्रिस मॉरिसने अवघ्या 18 चेंडूत नाबाद 36 धावांची आतषबाजी करत राजस्थान रॉयल्सला रोमांचक विजय तर प्राप्त करुन दिलाच. शिवाय, आपल्यासाठी राजस्थानने मोजलेली किंमत रास्तच असल्याचा जणू दाखला दिला. या लढतीत दिल्लीने 8 बाद 147 धावा केल्या तर राजस्थानने 19.4 षटकात 7 बाद 150 धावांसह विजयश्रीवर आपली मोहोर उमटवली. डेव्हिड मिलरची 43 चेंडूतील 62 धावांची खेळी देखील तितकीच महत्त्वाची ठरली.
शेवटच्या षटकात 13 धावांची गरज असताना ख्रिस मॉरिसने पहिल्या चेंडूवर 2 धावा घेतल्या व दुसऱया चेंडूवर डीप स्क्वेअरच्या दिशेने उत्तुंग षटकार खेचला. यामुळे, उर्वरित 4 चेंडूत 5 धावा, असे आव्हान आवाक्यात आले. टॉम करणच्या षटकातील तिसरा चेंडू निर्धाव गेला. पण, चौथ्या फुलटॉस चेंडूवर मॉरिसने पुन्हा एकदा डीप स्क्वेअरकडेच आक्रमक षटकार वसूल केला व राजस्थानच्या रोमांचक विजयावर शिक्कामोर्तब झाले.
विजयासाठी 148 धावांचा पाठलाग करताना राजस्थानचे पहिले चारही फलंदाज एकेरी धावेतच गुंडाळले गेले व यामुळे एकवेळ हा संघ 4 बाद 36 असा अडचणीत होता. चौथ्या षटकात 3 बाद 17 आणि डावाच्या मध्यापर्यंत 5 बाद 52 अशा बिकट स्थितीत ते होते. पण, त्याचवेळी डेव्हिड मिलर (43 चेंडूत 7 चौकार, 2 षटकारांसह 62) संघाच्या मदतीला धावून आला आणि नंतर विजयाचे सोपस्कार ख्रिस मॉरिस व जयदेव उनादकट (7 चेंडूत नाबाद 11) यांनी पूर्ण केले.
उनादकटचा भेदक मारा
तत्पूर्वी, मध्यमगती गोलंदाज जयदेव उनादकटने 3 बळी घेतल्यानंतर राजस्थान रॉयल्सने दिल्ली कॅपिटल्सला 8 बाद 147 धावांवर रोखले. 4 षटकात 15 धावात 3 बळी, असे पृथक्करण नोंदवणाऱया उनादकटने पृथ्वी शॉ, शिखर धवन, अजिंक्य रहाणे असे तिन्ही महत्त्वाचे फलंदाज गारद केले आणि यामुळे दिल्लीचा संघ चांगलाच गडगडला.
दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंतने 32 चेंडूत 51 धावांची जरुर आतषबाजी केली. त्याच्या खेळीत 9 चौकारांचाही समावेश राहिला. मात्र, यानंतरही दिल्लीला अपेक्षित धावा उभारता आल्या नाहीत. राजस्थानने नाणेफेक जिंकल्यानंतर येथे दिल्लीला प्रथम फलंदाजीला पाचारण केले होते.
पृथ्वी शॉ (2) व धवन (9) हे दोन्ही सलामीवीर अतिशय स्वस्तात बाद झाल्यानंतर दिल्लीची अतिशय खराब सुरुवात झाली. चौथ्या षटकातच त्यांची 2 बाद 16 अशी दाणादाण उडाली होती. डावातील दुसऱया षटकात शॉ पहिल्या गडय़ाच्या रुपाने बाद झाला. त्याने बॅकवर्ड पॉईंटवरील मिलरकडे सोपा झेल दिला. दुसरीकडे, धवनने रॅम्प शॉट मारण्याच्या प्रयत्नात आपली विकेट बहाल केली. राजस्थानचा यष्टीरक्षक-कर्णधारने आपल्या उजवीकडे झेपावत अप्रतिम झेल घेतला आणि धवनची खेळी संपुष्टात आणली.
अनुभवी अजिंक्य रहाणेचा आयपीएलमधील खराब फॉर्म या लढतीत देखील कायम राहिला. त्याने उनादकटच्या प्रतितास 110 किमी वेगाच्या चेंडूवर उनादकटकडे परतीचा झेल देत तंबूचा रस्ता धरला. पहिल्या 6 षटकांच्या पॉवर प्ले अखेर दिल्लीची 3 बाद 36 अशी दाणादाण उडाली आणि नंतरही हा पडझडीचा सिलसिला सुरुच राहिला.
मुस्तफिजूर रहमानने (2-29) मार्कस स्टोईनिसला जोस बटलरकरवी झेलबाद केले. बटलरने धावत जात अप्रतिम झेल टिपला. डावाच्या मध्यापर्यंत दिल्लीचा संघ 4 बाद 57 अशा स्थितीत होता. त्यानंतर पंतने धडाकेबाज फलंदाजी करत धावगती उंचावण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. त्याने तेवातियाच्या 11 व्या षटकात 4 चौकार खेचले आणि यातील 3 चौकार सलग होते. या षटकात दिल्लीने 20 धावा वसूल केल्या.
राजस्थानच्या त्या प्रसंगाला पुन्हा उजाळा!
ख्रिस मॉरिसने अवघ्या 18 चेंडूत 36 धावा जमवत राजस्थानला जिगरबाज विजय संपादन करुन दिल्यानंतर पुन्हा एकदा राजस्थान-पंजाब यांच्या मागील लढतीतील त्या प्रसंगाला उजाळा मिळाला, ज्यात शेवटच्या 2 चेंडूवर 5 धावांची गरज असताना सॅमसनने पाचव्या चेंडूवर एकेरी धाव नाकारली होती. राजस्थानला तो सामना 4 धावांनी गमवावा लागला होता. अर्थात, त्या प्रसंगाबद्दल बोलताना ख्रिस मॉरिस व संजू सॅमसन यांनी आपल्या मर्यादा अजिबात ओलांडल्या नाहीत. ‘सॅमसन त्यावेळी उत्तम बहरात होता. त्यामुळे, त्याने एकेरी धाव नाकारणे योग्यच होते’, असे मॉरिस त्या घटनेबद्दल बोलताना म्हणाला तर सॅमसनने देखील रिप्ले पाहिल्यानंतरही आपला निर्णय चुकीचा असल्याचे वाटत नाही, अशी प्रतिक्रिया दिल्लीविरुद्ध लढतीनंतर बोलताना नोंदवली.
धावफलक
दिल्ली कॅपिटल्स : पृथ्वी शॉ झे. मिलर, गो. उनादकट 2 (5 चेंडू), शिखर धवन झे. सॅमसन, गो. उनादकट 9 (11 चेंडूत 1 चौकार), अजिंक्य रहाणे झे. व गो. उनादकट 8 (8 चेंडूत 1 चौकार), रिषभ पंत धावचीत (पराग) 51 (32 चेंडूत 9 चौकार), मार्कस स्टोईनिस झे. बटलर, गो. मुस्तफिजूर रहमान 0 (5 चेंडू), ललित यादव झे. तेवातिया, गो. मॉरिस 20 (24 चेंडूत 3 चौकार), टॉम करण त्रि. गो. मुस्तफिजूर 21 (16 चेंडूत 2 चौकार), ख्रिस वोक्स नाबाद 15 (11 चेंडूत 2 चौकार), रविचंद्रन अश्विन धावचीत (मिलर-सॅमसन) 7 (4 चेंडूत 1 चौकार), कॅगिसो रबाडा नाबाद 9 (4 चेंडूत 1 चौकार). अवांतर 5. एकूण 20 षटकात 8 बाद 147.
गडी बाद होण्याचा क्रम
1-5 (पृथ्वी शॉ, 1.6), 2-16 (धवन, 3.1), 3-36 (रहाणे, 5.5), 4-37 (स्टोईनिस, 6.5), 5-88 (रिषभ, 12.4), 6-100 (14.5), 7-128 (टॉम, 18.2), 8-136 (अश्विन, 18.6)
गोलंदाजी
चेतन साकारिया 4-0-33-0, जयदेव उनादकट 4-0-15-3, ख्रिस मॉरिस 3-0-27-1, मुस्तफिजूर रहमान 4-0-29-2, रियान पराग 2-0-16-0, राहुल तेवातिया 3-0-27-0.
राजस्थान रॉयल्स : जोस बटलर झे. पंत, गो. वोक्स 2 (7 चेंडू), मनन वोहरा झे. रबाडा, गो. वोक्स 9 (11 चेंडूत 2 चौकार), संजू सॅमसन झे. धवन, गो. रबाडा 4 (3 चेंडूत 1 चौकार), शिवम दुबे झे. धवन, गो. रबाडा 4 (3 चेंडू), शिवम दुबे झे. धवन, गो. अवेश खान 2 (7 चेंडू), डेव्हिड मिलर झे. ललित, गो. अवेश खान 62 (43 चेंडूत 7 चौकार, 2 षटकार), रियान पराग झे. धवन, गो. अवेश 2 (5 चेंडू), राहुल तेवातिया झे. ललित, गो. रबाडा 19 (17 चेंडूत 2 चौकार), ख्रिस मॉरिस नाबाद 36 (18 चेंडूत 4 षटकार), जयदेव उनादकट नाबाद 11 (7 चेंडू). अवांतर 3. एकूण 19.4 षटकात 7 बाद 150.
गडी बाद होण्याचा क्रम
1-13 (वोहरा, 2.4), 2-13 (बटलर, 2.6), 3-17 (सॅमसन, 3.3), 4-36 (दुबे, 7.4), 5-42 (रियान, 9.2), 6-90 (तेवातिया, 14.5), 7-104 (मिलर, 15.5).
गोलंदाजी ख्रिस वोक्स 4-0-22-2, अवेश खान 4-0-32-3, रबाडा 4-0-30-2, आर. अश्विन 3-0-14-0, टॉम करण 3.4-0-35-0, स्टोईनिस 1-0-15-0.