सहकारमंत्री गोविंद गावडे यांचे उद्गार : 68व्या सहकार सप्ताहाचे उद्घाटन
प्रतिनिधी /फोंडा
सहकार क्षेत्राचा विस्तार तळागाळात झालेला आहे. या क्षेत्रात नव्याने भरारी घेण्यासाठी सहकार विज्ञान हा विषय शिक्षण क्षेत्रात समाविष्ट करणे गरजेचे आहे. या क्षेत्रातील कर्मचाऱयांमधील ‘कॉपी पेस्ट’ची मानसिकता बदलण्यासाठी कौशल्य विकसित मन्युष्यबळ तसेच सहकाराविषयी आवड असलेल्या लोकांनी येणे गरजेचे आहे, असे उद्गार सहकारमंत्री गोविंद गावडे यांनी काढले.
कुर्टी येथील सहकार भवनमध्ये आयोजित केलेल्या 68 व्या राष्ट्रीय सहकार सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री व फोंडय़ाचे आमदार रवी नाईक, एनआरआय आयुक्त ऍड. नरेंद्र सावईकर, प्रमुख वक्ते डॉ. शेखर साळकर, सहकार सचिव चोखाराम गर्ग, सहकार निबंधक अरविंद खुटकर, गोवा राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष श्रीकांत नाईक, उपाध्यक्ष विठ्ठल गावस, गोवा राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष उल्हास फळदेसाई, कुर्टीच्या उपसरपंच शर्मिला सांगावकर आदी उपस्थित होते.
सरकार व सहकार यांच्यात बांधीलकी हवी. सहकार कायद्यात वेळोवेळी बदल घडवून आणतानाच या क्षेत्रातील लोकांना प्रशिक्षण आवश्यक असल्याचे मंत्री गोविंद गावडे पुढे म्हणाले.
सहकार क्षेत्रातील आर्थिक गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी कडक कायदे व त्यांची कठोर अंमलबजावणी आवश्यक असल्याचे आमदार रवी नाईक म्हणाले. सहकारी संस्थांनी कर्ज देताना, परतफेडीची हमी तपासूनच कर्ज देण्याचे आवाहन त्यांनी केले. सहकार चळवळ ही गावोगावी पोचली असून ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम होण्यासाठी या क्षेत्राचा महत्त्वाचा वाटा असल्याचे नरेंद्र सावईकर यांनी सांगितले. भागधारक हे सहकार क्षेत्राचे खरे नियंत्रक आहेत. कोरोना काळात बऱयाच सहकारी संस्थानी जनतेला विविध प्रकारे मदत केल्याचा उल्लेखही त्यांनी केला.
आरोग्य क्षेत्रातही सहकार चळवळ रुजवावी : डॉ. शेखर साळकर
डॉ. शेखर साळकर म्हणाले, सहकाराचा विस्तार विविध क्षेत्रात झालेला आहे. यापुढे आरोग्य क्षेत्रातही सहकार चळवळ रुजणे काळाची गरज आहे. मुंबई महानगरात सहकार क्षेत्रातील भागधारकांनी इस्पितळे उभारली असून गोव्यातील आरोग्य क्षेत्रात सहकाराला खूप वाव आहे. तसे झाल्यास आरोग्यासंबंधी चांगली सेवा व साधनसुविधा उभारता येतील. श्रीकांत नाईक यांनी स्वागत तर अरविंद खुटकर यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपनिबंधक पंकज मराठे यांनी तर डॉ. मधू घोडकिरेकर यांनी आभार मनाले.