मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याहस्ते उदघाटनः विधानपरिषदेचे सभापती राजराजे निंबाळकर अध्यक्षस्थानी
प्रतिनिधी/सांगली
माजी खासदार व सहकारतपस्वी स्वर्गीय गुलाबराव पाटील यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याचा श्रीगणेशा गुरूवारी (दि. 16) दुपारी साडेतीन वाजता मुंबई येथील विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे असणार आहेत. तर अध्यक्षस्थानी विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर हे आहेत. अशी माहिती या समितीचे कार्यकारी सचिव पृथ्वीराज पाटील यांनी दिली.
पाटील म्हणाले, स्व. गुलाबराव पाटील यांनी आपली राजकीय कारर्किद सांगली जिल्ह्यातून सुरू केली. त्यानंतर त्यांनी राज्यपातळीवर आणि देशपातळीवर आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. त्यामुळे त्यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याचा प्रारंभ मुंबईत करण्यात येत आहे. पेरणोत्सव असे या सोहळ्याचे नाव आहे.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याहस्ते यावेळी गुलाबराव पाटील यांच्या कार्याची माहिती देणाऱया चित्रफितीचे उदघाटन केले जाणार आहे. या कार्यक्रमास माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद फडणवीस, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱहे, विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, संसदीय कार्यमंत्री अनिल परब, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची प्रमुख उपस्थिती आहे.
या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन या जन्मशताब्दी समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण, कार्याध्यक्ष बाळासाहेब थोरात, स्वागताध्यक्ष जयंत पाटील, कार्याध्यक्ष विश्वजीत कदम, समिती सदस्य बाळासाहेब पाटील, सतेज पाटील, शंभूराजे देसाई आणि कार्यकारी सचिव पृथ्वीराज पाटील यांनी केले आहे. या कार्यक्रमास ऊर्जा मंत्री नितीन राऊत, खासदार संजयकाका पाटील, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, विद्याधर अनास्कर, श्रीमती रजनी पाटील, अकुंश काकडे, जयराम देसाई, हिरामण सातारकर यांचीही विशेष उपस्थिती असणार आहे.