झाग्रेब / वृत्तसंस्था
येथील क्रोएशिया ग्रँड चेस टूरच्या सहाव्या फेरीत माजी वर्ल्ड चॅम्पियन विश्वनाथन आनंदला रशियाच्या अलेक्झांडर ग्रिश्चूकने बरोबरीत रोखले. ग्रिश्चूकने रुई लोपेझ गेममध्ये आनंदविरुद्ध 40 चालीअखेर बरोबरी प्राप्त केली. सहाव्या फेरीअखेर आनंदच्या खात्यावर आता 7 गुण आहेत.
या स्पर्धेत पाचव्या फेरीत आनंदने युक्रेनच्या ऍन्टोन कोरोबोव्हविरुद्ध दमदार विजय संपादन केला तर चौथ्या फेरीत अझरबैजानच्या शखरियार मॅमेद्यारोव्हविरुद्ध बरोबरी मिळवली. अलेखाईन व्हेरिएशनमधील ही लढत 70 चालीपर्यंत चालली होती.
51 वर्षीय विश्वनाथन आनंद प्रत्यक्ष पटावर एका वर्षाच्या कालावधीनंतर प्रथमच खेळत असून स्पर्धेत बुधवारी पहिल्या फेरीत डच ग्रँडमास्टर जॉन वहान फॉरीस्टविरुद्ध लक्षवेधी विजय संपादन केला होता. त्यानंतर मॅक्झिम लॅग्रेव्हविरुद्ध दुसरी फेरी गमविली तर इयान नेपोम्नियाचीविरुद्ध तिसरी फेरी बरोबरीत राखली होती. रशियन ग्रँडमास्टर इयान नेपोम्नियाची या वर्षाच्या उत्तरार्धात वर्ल्ड चॅम्पियन टायटलसाठी मॅग्नस कार्लसनला आव्हान देणार असून या ग्रँड चेस टूरमध्ये तो आघाडीवर आहे.
इयानने पाचव्या फेरीत राष्ट्रीय सहकारी अलेक्झांडर ग्रिश्चूकला हरवले तर पोलंडचा खेळाडू जान-क्रिस्तोफविरुद्ध बरोबरी मिळवली. या स्पर्धेच्या रॅपिड गटात (7 ते 9 जुलै) 10 इलाईट ग्रँडमास्टर्स 9 फेऱयात लढणार आहेत. याशिवाय, 10 व 11 जुलै रोजी ब्लित्झच्या 18 फेऱया होणार आहेत. या स्पर्धेसाठी दीड लाख अमेरिकन डॉलर्सचे एकूण बक्षीस असणार आहे.