काँग्रेस नेते धर्मेश सगलानी यांचा आरोप : बसस्थानक, पूर्णवेळ मुख्याधिकारी देण्यात सावंत सरकारला अपयश
प्रतिनिधी /पणजी
सांखळीचे बसस्थानक पूर्ण करण्यास आणि सांखळी पालिकेस पूर्णवेळ मुख्याधिकारी देण्यास सावंत सरकारला 10 वर्षे लागल्याची टीका काँग्रेस नेते धर्मेश सगलानी व प्रवीण ब्लॅगण यांनी करुन तो बसस्थानक प्रकल्प अर्धवट असतानाच त्याचे उद्घाटन करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांच्या साई नर्सिंग इन्स्टिटय़ूटसाठी बेकायदेशीरपणे गोवा गृहनिर्माण मंडळाची इमारत बळकावली असून ती पुन्हा मंडळाच्या ताब्यात देण्यात यावी अशी मागणी केली आहे. सांखळी पालिका ताब्यात घेण्यासाठी डॉ. सावंत यांनी सर्व ते प्रयत्न केले परंतु ते यशस्वी झाले नाही. त्यांचे ऐकले नाही की बदली झालीच म्हणून समजा अशी परिस्थिती सांखळी पालिकेत आहे. अनेक प्रकरणात त्यांना न्यायालयाने देखील दणका दिलेला आहे. तरीही ते सांखळी पालिका नगराध्यक्षांची सतावणूक करीत असल्याचे सांगण्यात आले.