प्रतिनिधी / सांगली
गुरूवारी जिल्हय़ात नवीन 340 रूग्ण वाढले. तर 222 जण कोरोनामुक्त झाले आहेत. उपचार सुरू असताना 15 जणांचे मृत्यू झाले आहेत. त्यामध्ये जिल्हय़ातील 12 जणांचा आणि परजिल्हय़ातील तिघांचा समावेश आहे. एकूण जिल्हय़ात 276 जणांचा आजअखेर कोरोनाने बळी गेला आहे. दरम्यान आमदार सुधीर गाडगीळ आणि त्यांची पत्नी यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
महापालिका क्षेत्रात 148 रूग्ण वाढले
महापालिका क्षेत्रात गुरूवारीही कोरोनाचा कहर सुरूच असलेला दिसून आला. 148 नवीन रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये सांगली शहरात 85 तर मिरज शहरात 63 रूग्ण वाढले आहेत. महापालिका क्षेत्रात सातत्याने रूग्ण वाढत चालल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. महापालिकेकडून वाढत्या रूग्णसंख्येला रोखण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. पण तरीही सातत्याने रूग्णसंख्या वाढतच चालली आहे. त्यामध्येच महापालिकेकडून रॅपीड ऍण्टीजन टेस्ट मोठय़ा प्रमाणात सुरू करण्यात आली आहे. या टेस्टमध्ये मोठय़ा प्रमाणात रूग्ण आढळून आले आहेत. तसेच सध्या जे रूग्ण वाढत आहेत. ते रूग्णांच्या संपर्कात आलेले हायरिस्क नातेवाईक आहेत. तसेच रूग्णांच्या बरोबर काम करणारे त्यांचे सहकारी आहेत. शहरातील गावठाणसह विविध उपनगरात हे रूग्ण आढळून आले आहेत. मिरजेत नवीन 63 रूग्ण वाढलेले आहेत. यामध्ये मिरजतेतील एका बँकेतील 20 जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. याशिवाय मिरजेतील विविध उपनगरातील रूग्ण आहेत. सांगली मिरज महापालिका क्षेत्रात मात्र आजअखेर एकूण रूग्णसंख्या चार हजार 613 झाली आहे.
ग्रामीण भागात कोरोनाचा हाहाकार; 192 रूग्ण वाढले.
गुरूवारी ग्रामीण भागात कोरोनाने हाहाकार केला आहे. एकाच दिवसात तब्बल 192 नवीन रूग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये आटपाडी तालुक्यात 22, जत तालुक्यात नऊ, कडेगाव तालुक्यात 12 रूग्ण वाढले आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यात 14, खानापूर तालुक्यात 13, मिरज तालुक्यात तब्बल 49 रूग्ण वाढले आहेत. पलूस तालुक्यात आठ, शिराळा तालुक्यात 28, तासगाव तालुक्यात 16 आणि वाळवा तालुक्यात 21 रूग्ण वाढले आहेत. असे एकूण ग्रामीण भागात 192 रूग्ण वाढले आहेत.
जिल्हय़ातील 12 जणांचा मृत्यू
जिल्हय़ातील 12 जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. यामध्ये सांगली शहरातील तिघांचा मृत्यू झाला आहे. शहरातील 81 आणि 50 वर्षीय व्यक्तीचा कोरोना रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर 49 वर्षीय महिलेचा भारती हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. मिरजेतील तीन व्यक्तीचा मृत्यू झाला त्यामध्ये 58, 68 वर्षीय व्यक्तीचा तसेच 61 वर्षीय महिलेचा मिरज कोरोना रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. कडेगाव तालुक्यातील नेवरी येथील 75 वर्षीय महिलेचा कोरोना रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. कवठेमहांकाळ येथील 42 वर्षीय व्यक्तीचा कोरोना रूग्णालयात मृत्यू झाला. तर मिरज तालुक्यातील बुधगाव येथील 65 वर्षीय व्यक्तीचा कोरोना रूग्णालयात मृत्यू झाला. कवठेपिरान येथील 55 वर्षीय व्यक्तीचा भारती हॉस्पिटल येथे मृत्यू झाला शिपुर येथील 76 वर्षीय व्यक्तीचा श्वास हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. शिराळा येथील 62 वर्षीय व्यक्तीचा प्रकाश हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. या 12 व्यक्तीच्या मृत्यूमुळे जिल्हय़ातील एकूण बळीची संख्या 276 झाली आहे.
परजिल्हय़ातील तिघांचा मृत्यू
परजिल्हय़ातील तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये कोल्हापूर जिल्हय़ातील औरवाड येथील 68 वर्षीय व्यक्तीचा वानलेस हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. इचलकरंजी येथील 86 वर्षीय व्यक्तीचा कोरोना रूग्णालयात तर चिपळून-खेड येथील 58 वर्षीय व्यक्तीचा भारती हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. परजिल्हय़ातील 79 जणांचे आजअखेर मृत्यू झाले आहेत.
222 जण कोरोनामुक्त
गुरूवारी जिल्हय़ात उपचार सुरू असणारे तब्बल 222 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सलग नवव्या दिवशी मोठय़ासंख्येने रूग्ण बरे झाल्याने रूग्ण बरे होण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जिल्हय़ात आजअखेर बरे झालेल्या रूग्णांची संख्या चार हजार 336 झाली आहे. त्यामुळे रूग्ण बरे होण्याची टक्केवारी वाढतच चालली आहे.
आमदार सुधीर गाडगीळ बाधित
भाजपाचे आमदार सुधीर गाडगीळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांची प्रकृती ठणठणीत आहेत. त्यांची पत्नीही कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. या दोघांच्यावर योग्य उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चांगली असल्याचे भाजपच्या पदाधिकाऱयांनी सांगितले.
कोरोनाची जिल्हय़ातील स्थिती
एकूण रूग्ण 7750
बरे झालेले 4336
उपचारात 3138
मयत 276