प्रतिनिधी / सांगली
सांगली विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रीय महामार्गाबाबत रस्ते व वाहतूक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबरोबर बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी सांगलीला राष्ट्रीय महामार्गावर आणण्याच्या दृष्टीने सूचना व निवेदन दिले. यामध्ये सांगली येथील शिवशंभो चौक ते तासगाव पाचवा मैल व सांगलीवाडी टोल नाका ते बायपास, कुपवाड ते तानंग हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग मध्ये समाविष्ट करावा तसेच सांगली व पेठ या रस्त्यांचे टेंडर लवकर करावे याबाबत विनंती केली.
त्यावेळी नितीन गडकरी यांनी सर्व गोष्टींचा सकारात्मक विचार करून योग्य ती अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले. यावेळी माजी मंत्री व आमदार सुरेश खाडे, पश्चिम महाराष्ट्र संघटक सरचिटणीस मकरंद देशपांडे, भाजपा प्रदेश सदस्य शेखर इनामदार, अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश सरचिटणीस मोहन व्हनखंडे, संघटक सरचिटणीस दीपक माने, स्थायी सभापती पांडुरंग कोरे, सचिव धनेश कातगडे आदी उपस्थित होते.