आटपाडी / प्रतिनिधी
आटपाडीतील शुक ओढ्यातील पाण्याच्या प्रवाहात पडलेल्या मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात मुलासह आई पाण्यात वाहून गेली. ही घटना गुरुवारी सकाळी आटपाडी सोमेश्वर नगर येथे घडली. बुडालेल्या माय लेकाचा शोध सुरू असून अद्याप दोघे सापडले नसल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
आटपाडी तालुक्यात टेंभू योजनेतुन पुराचे पाणी सोडण्यात आले असून तलावातून हे पाणी सांगोला तालुक्यात जात आहे. पाण्याला प्रवाह असून ओढ्यात पाणी जादा आहे. या पात्रात कपडे धुण्यासाठी राणी चंद्रकांत पारसे (वय 30) या मुलगा पृथ्वीराज उर्फ दादा चंद्रकांत पारसे (वय 10) याला सोबत घेऊन गेल्या. पाण्याचा प्रवाह न आवरल्यामुळे आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास पृथ्वीराज बुडाला. त्याला वाचविण्यासाठी आई पात्रात उतरली. पण दोघेही पाण्यात वाहून गेले. त्यांचा शोध करण्यात येत असून अद्याप शोध लागलेला नाही. पाण्याचा प्रवाह वाढत असल्यामुळे नागरिकांनी ओढा पात्रात जाऊ नये, असे आवाहन सरपंच सौ. वृषाली पाटील यांनी केल.