शंकर मोहिते यांचा इशारा : विट्यात सकल मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन
प्रतिनिधी / विटा
येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकात शुक्रवार २५ सप्टेंबर रोजी मराठा क्रांती मोर्चा सांगली जिल्हा यांच्यावतीने मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नांवर ठिय्या आंदोलन करण्यात आले. सर्वच पक्ष आंदोलनाला पाठिंबा देत आहेत, मग आरक्षण का मिळत नाही ? असा खडा सवाल शंकर मोहिते यांनी यावेळी उपस्थित केला. आमदार अनिल बाबर यांनी आंदोलकांची भेट घेऊन पाठिंब्याचे पत्र दिले. तर खासदार संजयकाका पाटील आणि माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी दूरध्वनीवरून पाठिंबा दिल्याची माहिती मोहिते यांनी दिली.
सकल मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने राज्यभर मराठा आरक्षण प्रश्नासंदर्भात ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. खानापूर तालुका मराठा क्रांती मोर्चा समितीने येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकात ठिय्या आंदोलन केले. आमदार अनिल बाबर यांनी स्वतः उपस्थित राहून आंदोलनाला पाठींबा दिला. तसे लेखी पत्र त्यांनी आंदोलकांकडे सुपूर्द केले. भगव्या टोप्या, मास्क परिधान केलेल्या आंदोलकांनी घोषणाबाजी करीत मराठा आरक्षणाची जोरदार मागणी केली. याबाबतच्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार ऋषीकेत शेळके याना देण्यात आले.
यावेळी खानापूर तालुका मराठा क्रांती मोर्चा समितीचे शंकर मोहिते म्हणाले, सर्वच नेते आणि पक्ष मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. मग मराठा समाजाला आरक्षण का मिळत नाही? सरकारने सध्या पोलिस भरती आणि शासकीय भरती जाहीर केली आहे. मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लागत नाही, तोपर्यंत त्याला स्थगिती द्यावी. सध्या जगात कोरोनाचा लढा सुरू आहे. त्यामुळे आपण मर्यादित स्वरूपात आंदोलन करीत आहोत. परंतु नजीकच्या काळात जर न्याय नाही मिळाला तर छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा गनिमी कावा आम्हाला माहीत आहे. आमच्या हातात लाठ्या, काठ्या येण्याची वाट बघू नका, असा इशारा मोहिते यांनी दिला.
सरकार समाजाला सवलती आणि आर्थिक सहाय्य देण्याच्या घोषणा करीत असले, तरी आमची मुख्य मागणी आरक्षणाची आहे. त्यावर लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी शंकर मोहिते यांनी केली. यावेळी नगरसेवक अमर शितोळे, महेश बाबर, रवींद्र कदम, विनोद पाटील, विजय चव्हाण, रणजित मोहिते, ऍड. रोहित पवार, राजू जाधव, भाजप युवा मोर्चा राज्य सचिव जगन्नाथ पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.