प्रतिनिधी / सांगली
शुक्रवारी जिल्हय़ात नवीन 209 रूग्ण वाढले तर 118 जण कोरोनामुक्त झाले आहेत. उपचार सुरू असताना 12 जणांचे मृत्यू झाले आहेत. त्यामध्ये जिल्हय़ातील 10 जणांचा आणि परजिल्हय़ातील दोघांचा समावेश आहे. एकूण जिल्हय़ात 201 जणांचा आजअखेर कोरोनाने बळी गेला आहे.
महापालिका क्षेत्रात 83 रूग्ण वाढले
महापालिका क्षेत्रात शुक्रवारी 83 रूग्ण वाढले. त्यामध्ये सांगली शहरात 60 तर मिरज शहरात 23 रूग्ण वाढले आहेत. सांगली शहरात नवीन रूग्ण वाढण्याचे प्रमाण थोडे कमी होत चालले आहे. सध्या जे रूग्ण वाढत आहेत. ते रूग्णांच्या संपर्कात आलेले त्यांचे नातेवाईक आहेत. तसेच रूग्णांच्याबरोबरचे सहकारी आहेत. शुक्रवारी जे रूग्ण वाढले आहेत. त्यातील अधिकांश रूग्ण हे खणभाग, गावभाग, शंभरफुटी, एमएसईबी रोड, गर्व्हेमेंट कॉलनी, विजयनगर , शिंदे मळा, सांगलीवाडी, अभयनगर, सहय़ाद्रीनगर, गुलमोहोर कॉलनी, हरीपूर रोड या भागातील हे रूग्ण आहेत. तर मिरजेत जे रूग्ण आढळून आले आहेत. ते गावठाणसह विविध उपनगरातील आहेत. भारतनगर, जीएमसीएच, साईनाथ पार्क, इंदिरानगर, बेथेलहेमनगर, मंगळवार पेठ, नदीवेस याठिकाणी आढळून आले आहेत. सांगली मिरज महापालिका क्षेत्रात मात्र आजअखेर एकूण रूग्णसंख्या तीन हजार 518 झाली आहे.
ग्रामीण भागात 126 रूग्ण वाढले
ग्रामीण भागात मात्र महापालिकेपेक्षा अधिक रूग्ण आढळून आले त्यामध्ये आटपाडी तालुक्यात 22, जत तालुक्यात आठ, कडेगाव तालुक्यात तीन रूग्ण वाढले आहेत. खानापूर तालुक्यात तीन, मिरज तालुक्यात 20 रूग्ण वाढले आहेत. पलूस तालुक्यात 14, शिराळा तालुक्यात 14, तासगाव तालुक्यात आठ आणि वाळवा तालुक्यात 34 रूग्ण वाढले आहेत. असे एकूण ग्रामीण भागात 126 रूग्ण वाढले आहेत.
जिल्हय़ातील 10 जणांचा मृत्यू
जिल्हय़ातील 10 जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. यामध्ये सांगली शहरातील तिघांचा मृत्यू झाला आहे. शहरातील 81 वर्षीय व्यक्तीचा कोरोना रूग्णालयात तर 82 वर्षीय महिलेचा मिरज चेस्ट हॉस्पिटल येथे आणि 61 वर्षीय महिलेचा मिरजेच्या कोरोना रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मिरजेतील दोन व्यक्तीचा मृत्यू झाला त्यामध्ये 69 आणि 28 वर्षीय व्यक्तीचा मिरज चेस्ट हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. तासगाव येथील तिघांचा मृत्यू झाला. त्यामध्ये 64 वर्षीय महिला आणि 73 वर्षीय व्यक्तीचा भारती हॉस्पिटल येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला. तर 72 वर्षीय व्यक्तीचा कोरोना रूग्णालयात मृत्यू झाला मिरज तालुक्यातील तालुक्यातील मालगाव येथील 45 वर्षीय व्यक्तीचा भारती हॉस्पिटल येथे मृत्यू झाला तर पलूस तालुक्यातील नागठाणे येथील 58 वर्षीय महिलेचा प्रकाश हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. या 10 व्यक्तीच्या मृत्यूमुळे जिल्हय़ातील एकूण बळीची संख्या 201 झाली आहे. शुक्रवारी परजिल्हय़ातील दोघांचा मृत्यू झाला आहे त्यामध्ये कोल्हापूर जिल्हय़ातील कुरूंदवाड येथील 73 वर्षीय व्यक्तीचा भारती हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. तर चिपरी येथील 75 वर्षीय व्यक्तीचा मिरज चेस्ट हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. परजिल्हय़ातील 58 जणांचे आजअखेर मृत्यू झाले आहेत.
118 जण कोरोनामुक्त
शुक्रवारी जिल्हय़ात उपचार सुरू असणारे 118 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सलग चौथ्या दिवशी मोठय़ासंख्येने रूग्ण बरे झाल्याने रूग्ण बरे होण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जिल्हय़ात आजअखेर बरे झालेल्या रूग्णांची संख्या तीन हजार 70 झाली आहे. त्यामुळे रूग्ण बरे होण्याची टक्केवारी वाढतच चालली आहे.
कोरोनाची जिल्हय़ातील स्थिती
एकूण रूग्ण 5788
बरे झालेले 3070
उपचारात 2517
मयत 201