बेस्टतर्फे भेट, अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार
कर्मचाऱ्यांसह प्रवाशांचेही जीव टांगणीला
आकडा वाढण्याची भिती
प्रतिनिधी / सांगली
कोरोना काळात मुंबईत ड्युटीसाठी गेलेले जिल्हयातील १०५ एसटी कर्मचारी कोरोनाबाधित झाले आहेत. बेस्टची सेवा अपुरी पडू लागली असता सांगलीतून 425 कर्मचारी गेले होते. त्यातील 105 कर्मचार्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे एसटी कर्मचारी संघटनेकडून सांगण्यात आले. काही अधिकाऱ्यांच्या या मनमानी कारभारामुळे कर्मचारी वर्गातून संताप व्यक्त होत आहे. मुंबईतील बेस्टची सेवा अपुरी पडत असल्याने सांगलीतून गेलेले 425 कर्मचारी नुकतेच दोन दिवसांपूर्वी जिल्हात परतले. त्यांची तपासणी केली असता अनेकांना कोरोगाची लागण झाली असल्याचे दिसून आले आहे.
हा आकडा १०५ वर गेला असून अजून रुग्ण वाढण्याची भीती आहे. कवठेमहांकाळ आगारातील दोन कर्मचाऱ्याचा अहवाल प्रलंबित असलानासुद्धा त्यांना मुंबईला पाठवले गेले होते. त्यानंतर तिथे ते बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला. तिथे गेलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना रहाणे, जेवण, तसेच आंघोळीसह अनेक गोष्टींचा त्रास झाला. तसेच बसेसदेखील निर्जंतुकीकरण केल्या जात नव्हत्या. यामुळे कोरोनासाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. परतलेल्या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी केली जात असून, दोन दिवसांत तब्बल १००हून अधिक कर्मचारी कोरोनाबाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यामळे एसटी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये खळबळ उडाली आहे. त्यांच्यासह बसमधून प्रवास केलेले प्रवासी आणि संपर्कातील इतरांचा जीव टांगणीला लागला आहे. अद्याप काहीचा आहवाल प्रलंबित
असून हा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेथून परतलेल्या ४२५ पैकी १०५ कर्मचारी कोरोनाबाधित आढळले असून इतरांचा अहवाल प्रलंबित आहे. दरम्यान ४२५ जणांची दुसरी बॅचही मुंबईला रवाना झाली असून, ऐन सणाच्या मुहुर्तावर हे कर्मचारी कोरोना घेऊन परततील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
आगारनिहाय बाधित कर्मचारी
सांगली आगार ६, मिरज ७, इस्लामपूर ५, विटा १४, आटपाडी १५, जत १५, कवठेमहांकाळ १४, तासगाव २४, शिराळा ५ याप्रमाणे आतापर्यंत १०५ कर्मचारी बाधित आढळले आहेत. त्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एसटीचे अधिकारी उत्पन्न मिळवण्यासाठी मनमानी कारभार करत आहेत. कामगारांचा जीव
धोक्यात घालून त्यांना मुंबईला पाठवले जात आहे. कर्मचाऱ्यांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी
संघटनेकडून लवकरच तीव्र आंदोलन केले जाईल. -अशोक खोत,सांगली विभागीय अध्यक्ष, एसटी कामगार संघटना.