आठ दिवसांच्या ड्रेनेज गळतीने रेल्वे जंक्शन परिसराला पाण्याचा वेढा
प्रतिनिधी / मिरज
मिरज रेल्वे जंक्शन सध्या ड्रेनेजच्या पाण्याने पुर्णतः वेढले आहे. स्टेशन परिसरात असलेल्या तीन ड्रेनेजना एकाचवेळी गळती लागल्याने घाण पाण्याचा हा लोंढा रेल्वे स्टेशनच्या मुख्य प्रवेश द्वारावर आला आहे. ड्रेनेजच्या पाण्याचे तळे साचले असल्याने हॉटेल, चहाच्या टपऱ्या, विविध खाद्य पदार्थ दुकानांमध्येही ड्रेनेजचे पाणी शिरले आहे. रेल्वे प्रशासनाने महापालिकेवर जबाबदारी सोपवून हात झटकले आहेत. महापालिकेला वारंवार तक्रारी करूनही ड्रेनेज गळती थांबली नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासन आणि महापालिका प्रशासनात समन्वय नसल्याने गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेली स्टेशन समोरील ड्रेनेज गळती थांबता थांबेना, असे चित्र आहे.