ऍप्लीकेशनवर बँकेची माहिती घेऊन रक्कम हडपली
प्रतिनिधी / मिरज
जम्मू काश्मिर येथे लष्करी सेवत असणाऱ्या पतीकडून बँकेत पैसे ट्रान्सफर करण्यासाठी मोबाईलवर ऍप्लीकेशनवर डाउढनलोड केल्याने पत्नीला पाच लाख रुपयांचा ऑनलाईन गंडा घालण्यात आला. याबाबत अमोल विठ्ठल माने (वय 19, रा. सुभाषनगर) यांनी मिरज ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, अमोल माने हे सुभाषनगर येथे आपल्या आईसोबत राहण्यास असून, त्यांचे वडील विठ्ठल माने हे जम्मू काश्मिर येथे लष्करी सेवेत आहेत. ते आपल्या पत्नीच्या स्टेट बँक खात्यावर पैसे पाठवित असतात. नेहमी प्रमाणे त्यांनी पैसे पाठविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पैसे ट्रान्सफर होत नव्हते. त्यामुळे त्यांनी गुगल पे कंपनीच्या हेल्पलाईन क्रमांकावर फोन करुन माहिती घेतली. त्यानंतर त्यांच्या मोबाईलवरुन पत्नीच्या मोबाईलवर एक एसएमएस पाठविला. त्यामध्ये एक लिंक होती. या लिंकला क्लिक केल्यानंतर गुगल प्ले स्टोअरवरुन टू युवर पीसी फोन व क्युक स्पोर्टस् हे ऍप्लीकेशन डाऊनलोड करण्यास सांगण्यात आले.
मुलीने या ऍप्लीकेशनची डाऊनलोडची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यामध्ये बँक खाते क्रमांक आणि आयएफसी कोड समाविष्ट करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर एक ओटीपी कोड आला. हा कोड ऍप्लीकेशनमध्ये टापई करताच लष्कर अधिकाऱयाच्या पत्नीच्या बँक खात्यावरुन चार लाख, 99 हजार, 995 रुपयांची रक्कम काढली असल्याचा एसएमएस आला. त्यानंतर आपली फसवणूक झाली असल्याचे समजाताच अधिकाऱ्याचा मुलगा अमोल विठ्ठल माने यांनी मिरज ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे. दरम्यान, ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ झाली असून, नागरिकांनी कोणत्याही प्रकारचे अपरिचित ऍप्लीकेशन डाऊनलोड करु नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.