खटाव येथील दुर्दैवी घटना, मृतदेह खांबावरच लटकला
प्रतिनिधी/मिरज
विद्युत खांबावर दुरुस्ती करण्यासाठी चढलेल्या कंत्राटी वायरमनला वीजेचा जबर धक्का लागून विद्युत खांबावरच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मिरज तालुक्यातील खटाव गावात परिट वस्ती येथे बुधवारी दुपारी घडली. श्रीशैल महादेव शिंगाडे (वय 24) असे मृत वायरमनचे नांव आहे. सदर वायरमनचा मृतदेह विद्युत खांबावरच लटकत होता. मिरज ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस पंचनामा करीत आहेत.
घटनास्थळावरुन मिळालेली अधिक माहिती अशी, खटाव गावातील परिट वस्तीमध्ये एका ग्राहकाची तक्रार आल्यानंतर श्रीशैल हे दुरूस्तीसाठी गेले होते.
ते डीपी ट्रान्सफार्मची पाहणी करण्यासाठी विद्युत खांबावर चढले होते. मात्र, लिंगनूर येथील विद्युत उपकेंद्रावरुन उच्च दाबाचा वीज पुरवठा सुरूच होता. विद्युत प्रवाहीत तारेला श्रीशैल शिंगाडे यांचा हात लागल्याने खांबावरच त्यांचा जागीच मृत्यू झाला. बराच उशिरापर्यंत त्यांचा मृतदेह खांबावरच लटकत होता. ग्रामस्थांनी याची माहिती महावितरण कार्यालयास दिल्यानंतर विद्युत प्रवाह बंद करुन मृतदेह खाली उतरण्यात आला. ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. महावितरणच्या निष्काळजीपणामुळे कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थांतून होत आहे.