आरग येथे सासरच्या जाचाला कंटाळून नववाहितेने केली होती आत्महत्या
प्रतिनिधी / मिरज
मिरज तालुक्यातील आरग येथे नयना क्रांतीकुमार वडगावे (वय 24) या नवविवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांनी सासू आणि पतीवर गुन्हा दाखल केला आहे. सासू ज्योती जीवनधर वडगावे आणि पती क्रांतीकुमार जीवनधर वडगावे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. सदर दोघांनी संगनमत करुन विवाहितेचा छळ केला होता. या छळाला कंटाळूनच तिने आत्महत्या केली असल्याची फिर्याद मयत विवाहितेची बहिण नविला संकेत हंजे (वय 26 रा. किणी हातकणंगले, जि. कोल्हापूर) यांनी दिली आहे.
नविला हंजे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, चार महिन्यांपूर्वी आरगेतील क्रांतीकुमार वडगावे याच्याशी नयना हिचा विवाह झाला होता. तेव्हापासून नयना हिचा हुंड्यासाठी छळ सुरू होता. सासू आणि पती हे दोघे संगनमत करुन नयना हिला, तू अगोदर चांगली आहेस, असे वाटले होते. तुमची माणसे चांगली नाहीत. आमच्या मुलाला अगोदर १२ तोळे सोने-चांदी तसेच इतर भांडी देणारी स्थळे आली होती. तुझ्याकडून आम्हाला काहीही आले नाही, असे वारंवार टोचून बोलून शिवीगाळ आणि मारहाण करण्यात येत होती. त्यामुळे या त्रासाला कंटाळूनच नयना हिने शुक्रवारी गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे नविला हंजे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. हंजे यांच्या फिर्यादीनुसार सासू ज्योती आणि पती क्रांतीकुमार या दोघांवर मिरज ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.