वानलेसवाडी येथील संशयितास अटक भर चौकातील प्रकार
प्रतिनिधी / सांगली
सांगली येथे विश्रामबाग चौकात नाकाबंदीच्या दरम्यान बंदोबस्ताला असणाऱ्या पोलीस हवालदाराला जीवे मारण्याचा प्रयत्न एकाकडून करण्यात आला. ही घटना सोमवारी दुपारी पावणे बाराच्या सुमारास घडली. याप्रकरणी संशयित रवींद्र विठ्ठल सूर्यवंशी वय 30, रा. श्रीरामनगर गल्ली नंबर तीन वानलेसवाडी सांगली याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरोधात जखमी पोलीस हवालदार सचिन शिवाजी पवार यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबतची हकीकत अशी की, जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने कडक लॉकडाऊन पाळण्यासाठी विश्रामबाग चौकात नाकाबंदी लावण्यात आली आहे. याठिकाणी फिर्यादी सचिन पवार हे डय़ुटी करत असताना याठिकाणी संशयित रवींद्र सूर्यवंशी एका दुचाकीवरून आला, त्याला पवार यांनी अडविल्यानंतर सूर्यवंशी यांनी मला अडवण्याचे कारण नाही असे सांगत मी कोठेही जावू तुम्ही कोण असे सांगितले त्यावेळी पवार यांनी त्याला अडविले असता सूर्यवंशी यांने पवार यांच्यावर हात उगारला आणि त्यांना मारहाण केली तसेच त्यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने रस्त्यावर पडलेला दगड उचलून तो पवार यांच्याकडे मारला त्यावेळी पवार हे बाजूला सरले त्यामुळे त्यांना हा दगड लागला नाही.
इतर पोलीसांनी तात्काळ संशयित सूर्यवंशी याला पकडले आणि त्याला ताब्यात घेण्यात आले. जखमी पवार यांच्यावर वसंतदादा सर्वोपचार रूग्णालयात उपचार सुरू करण्यात आल्यानंतर त्यांनी सूर्यवंशी यांच्याविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार दाखल केली या तक्रारीनुसार सूर्यवंशी याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणांचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांच्याकडे देण्यात आला आहे.
सलग दुसऱ्या दिवशी पोलीसांवर हात उगारला
खणभाग येथे सामाजिक कार्यकर्ते असिफ बावा आणि त्यांच्या हुल्लडबाज सहकाऱयांनी महिला पोलीसांवर हात उगारला होता, तसेच विनयभंग केला होता. त्यानंतर सलग दुसऱया दिवशी पुन्हा एकदा पोलीसांवर एकाने हात उगारला आहे. त्यामुळे पोलीसांनी आता याविरोधात कडक भूमिका घेतली आहे. जिल्हय़ात अनेकठिकाणी कोम्बींग आŸपरेशन सुरू करण्यात आले आहे.