2 हजार 45 रुग्णांवर उपचार, 1 हजार 786 रुग्ण बरे, 126 डॉक्टर्स, कर्मचारी यांचे अखंड योगदान
प्रतिनिधी / सांगली
सांगली जिल्हा क्रीडा संकुल मिरज येथे उभारण्यात आलेले 156 खाटांचे डेडिकेटेड कोव्हिड हेल्थ सेंटर 15 एप्रिल पासून 31 ऑगस्ट अखेर अखंड, अविरतपणे कोव्हिड रुग्णांच्या सेवेत कार्यरत होते. या सेंटरमध्ये आज अखेर दाखल झालेल्या 2 हजार 45 रुग्णांवर उपचार करण्यात येऊन यातील 1 हजार 786 रुग्ण या ठिकाणी पुर्णपणे बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तर 139 रुग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भात करण्यात आले. या साडेचार महिन्यांच्या कालावधीत 108 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यु झाला.
या ठिकाणी सेवा देणारे डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ, पॅरामेडिकल स्टाफ या सर्वांच्या योगदानाबद्दल आपल्याला अभिमान असल्याचे सांगत सदरचे कोव्हिड सेंटर आजपासून पुढील आदेश होई पर्यंत बंद करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले. यावेळी त्यांनी येत्या काळात कोरोनाचे रुग्ण वाढल्यास पुन्हा हे सेंटर सुरु करण्यात येईल, असेही स्पष्ट केले.
15 एप्रिल 2021 ला जिल्हा क्रीडा संकुल मिरज येथे सुरु करण्यात आलेल्या 156 खाटांच्या डेडिकेटेड कोव्हिड हेल्थ सेंटरमध्ये 7 व्हेन्टीलेटर, 2 बायपॅप मॉनिटर, 5 हायफलो, 5 मॉनिटर तसेच सर्व 156 ऑक्सिजन बेड उपलब्ध होते. सदरचे सेंटर जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी व डीसीएचसी क्रीडा संकुल मिरजचे अध्यक्ष चंद्रकांत गुड्डेवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांच्या देखरेखी खाली सुरु होते. या ठिकाणी उपचार करणारी माणसे, सुविधा, स्वच्छता, जेवन अतिशय चांगले असल्याबद्दल त्यांनी प्रशासनाचे व सर्व टीमचे आभार मानले.