उपाध्यक्षपदी कल्लवा करेगार यांची निवड
वार्ताहर / सांबरा
सांबरा ग्रामपंचायतीच्या झालेल्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत दोन समिती व एक अपक्ष सदस्याच्या पाठिंब्याच्या जोरावर भाजप पुरस्कृत ग्राम विकास आघाडीच्या रंजना विठ्ठल अप्पयाचे अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी कल्लवा भागाणा करेगार या निवडून आल्या.
सोमवारी सकाळी 10 वाजता निवडणुकीच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला. निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतपत्रिकाद्वारे गुप्त मतदान घेण्यात आले. यामध्ये रंजना अप्पयाचे यांनी 18 मते घेऊन अध्यक्षपदी आल्या तर प्रतिस्पर्धी उमेदवार विमल फकिरा मास्तमर्डी यांना 15 मतांवर समाधान मानावे लागले. तर उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत कल्लवा भागाणा करेगार यांनीही 18 मते घेत उपाध्यक्षपदी विजय मिळविला. त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार श्वेता उल्हास बम्मणवाडी यांनाही पंधरा मतांवर समाधान मानावे लागले.
येथील ग्रामपंचायत सदस्यांची संख्या 33 असून यापैकी पंधरा जागांवर भाजपने विजय मिळवला होता तर 9 जागांवर काँग्रेस, चार जागा श्रीराम सेना व अन्य जागांवर अपक्ष उमेदवार निवडून आले होते. विजयासाठी 17 मतांची गरज असताना भाजप पुरस्कृत आघाडीने म. ए. समितीचे भुजंग गिरमल व राजश्री दौलत जोई व अपक्ष सदस्या गंगा देसाई यांना आपल्याकडे ओढून घेण्यात यश मिळवले. त्यामुळे त्यांच्याकडे सदस्य संख्या 18 झाली त्यामुळे त्यांना अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीत बाजी मारता आली. निवडणूक अधिकारी म्हणून शहर शिक्षणाधिकारी बजंत्री यांनी काम पाहिले. दुपारी दोन वाजता निवडणूक अधिकाऱयांनी अध्यक्ष उपाध्यक्ष यांची नावे जाहीर केली. निवडणुकीनंतर विजयी मिरवणूक काढत जल्लोष केला.