प्रतिनिधी/ बेळगाव
शहरापासून जवळ असलेल्या भुतरामहट्टी प्राणी संग्रहालयात मागील दोन दिवसांत सांबर, अस्वल आणि तरस आणण्यात आल्याने पर्यटकांचा ओघ वाढला आहे. त्यामुळे साहजिकच महसुलात वाढ झाल्याने संग्रहालयाच्या व्यवस्थापनाला दिलासा मिळाला आहे.
म्हैसूर येथील प्राणी संग्रहालयाच्या धर्तीवर भुतरामहट्टी प्राणी संग्रहालयाचा विकास साधला जात आहे. तब्बल 34 एकर परिसरात पसरलेल्या या मिनी झूमध्ये वन्यप्राण्यांसाठी विशेष निवाराशेडची व्यवस्था करण्यात आली आहे. गतवषी सिंह, वाघ, बिबटय़ा, कोल्हा तर आता अस्वल, तरस आणि सांबर दाखल झाल्याने वन्यप्राण्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. याबरोबरच हरिण, मगर, पोपट, मोर यासह इतर पक्षीही दाखल झाल्याने पर्यटकांची पाऊले भुतरामहट्टीकडे वळत आहेत.
भुतरामहट्टी येथील निसर्गधामाचे मिनी प्राणी संग्रहालयात रुपांतर करून वन्य प्राण्यांसाठी नियोजनबद्ध बांधणी केली जात आहे. टप्प्याटप्प्याने विविध वन्यप्राणी दाखल होत असून येत्या काही दिवसांत चित्ता, गवीरेडे व इतर प्राणी दाखल होणार आहेत. आतापर्यंत सिंह, वाघांसह मोठे 16 वन्यप्राणी दाखल झाल्याने पर्यटकांचा ओघ वाढला आहे.
शनिवार, रविवारसह सुटीच्या दिवशी गर्दी
प्राणी संग्रहालय मंगळवार वगळता शनिवार, रविवार आणि शासकीय सुटीदिवशीही खुले ठेवण्यात येत आहे. त्यामुळे नोकरदार आणि विद्यार्थ्यांची संख्या सुटीदिवशी वाढत आहे. दररोज 20-25 हजार असलेला महसूल सुटीदिवशी 40 हजारपर्यंत जात आहे. अवकाळी पावसामुळे पर्यटकांनी पाठ फिरविली होती. मात्र, आता उघडीप पडल्याने सुटीच्या दिवशी पर्यटकांची वर्दळ वाढत आहे.