ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबईच्या अंधेरी परिसरातील साकीनाका येथील बलात्कार पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. मुंबईतील राजावाडी रुग्णालयात पीडित महिलेवर उपचार सुरू होते. मोठय़ा प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने पीडित महिला अद्यापही बेशुद्धावस्थेत होती. आज सकाळी पीडितेची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे देशभरातून संताप व्यक्त होत असून, सामाजिक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
शुक्रवारी साकीनाका येथील खैरानी रोड परिसरात पीडित महिलेवर बलात्कार करण्यात आला. त्यानंतर सैतानालाही लाजवेल अशा प्रकारचे कृत्य आरोपीने केले होते. शुक्रवारी पहाटे साडे तीन वाजण्याच्या सुमारास कंट्रोल रुमला साकीनाका येथे खैराना रोडवर एक महिला रक्ताच्या थारोळय़ात बेशुद्ध अवस्थेत पडली असल्याचा फोन आला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पीडितेला रुग्णालयात दाखल केले. मोठय़ा प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने पीडित महिला बेशुद्ध होती. आज उपचारादरम्यान पीडितेची प्राणज्योत मालवली.
दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मोहन चौहानला अटक केली आहे. या प्रकरणात आणखी काहीजण सामिल असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.