वृत्तसंस्था /शारजा
आयसीसी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सोमवारी येथे अफगाणिस्तान-स्कॉटलंड हे संघ आमनेसामने भिडणार आहेत. या सामन्याला भारतीय प्रमाण वेळेनुसार सायंकाळी 7.30 वाजता प्रारंभ होईल.
अलीकडेच म्हणजे गेल्या ऑगस्टमध्ये अफगाण देशावर तालिबानने ताबा मिळाल्यानंतर या देशाच्या क्रिकेट हालचालीवर विपरित परिणाम होईल, असे वाटत होते. पण अफगाणच्या क्रिकेट संघटनेने या स्पर्धेसाठी शेवटच्या क्षणी संघाची घोषणा केली.
संघ निवडीच्या प्रक्रियेवेळी सदस्यांमध्ये मतभेद दिसून आल्याने या संघातील फिरकी गोलंदाज रशीद खानने आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे निवड समितीने अनुभवी अष्टपैलू मोहम्मद नबीकडे पुन्हा संघाचे नेतृत्व सोपविले. या स्पर्धेपूर्वी झालेल्या दोन सरावाच्या सामन्यात अफगाण संघाचे कामगिरी समाधानकारक झाली. एका सामन्यात त्यांनी माजी विजेत्या विंडीजला पराभवाचा धक्का दिला. दुसऱया सरावाच्या सामन्यात त्यांना दक्षिण आफ्रिकेकडून हार पत्करावी लागली.
अफगाणची गोलंदाजी फलंदाजीच्या तुलनेत अधिक भक्कम वाटते. अनुभवी रशीद खान, मोहम्मद नबी आणि मुजीब झेद्रन हे अफगाण संघातील प्रमुख फिरकी गोलंदाज आहेत. शारजाहच्या संथ खेळपट्टीवर हे गोलंदाज चांगली कामगिरी करतील असे वाटते. नझिबूल, कर्णधार नबी, झेझई यांच्याकडून फलंदाजीत अधिक धावा नोंदविल्या गेल्या तर अफगाणला विजयाची आशा बाळगता येईल.
स्कॉटलंड संघाचे नेतृत्व कोएत्झरकडे सोपविण्यात आले आहे. पात्र फेरीच्या स्पर्धेतील स्कॉटलंडने आपले तिन्ही सामने जिंकून सुपर 12 संघात स्थान मिळविले आहे. पात्र फेरीच्या सामन्यात स्कॉटलंडने बांगलादेशला पराभवाचा धक्का दिला होता. या संघातील वेगवान गोलंदाज व्हिल, डेव्ही तसेच फिरकी गोलंदाज वेट यांच्या कामगिरीकडे अधिक लक्ष राहील. कोएत्झर, बेरिंग्टन, क्रॉस, बज यांच्यावर स्कॉटलंड संघाच्या फलंदाजीची भिस्त राहील.