पालकमंत्री जयंत पाटील यांनी केली चार ठिकाणच्या जागेची पाहणी
प्रतिनिधी / कुपवाड
महापालिकेच्या माध्यमातुम कुपवाड शहर व विस्तारित भागात अद्यावत बागबगीचा विकसित करण्यासाठी राष्ट्रवादीने कंबर कसली आहे. यादृष्टीने पालकमंत्री जयंत पाटील यांनी कुपवाड परिसरातील चार ठिकाणच्या जागेची नुकतीच पाहणी केली.
सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका स्थापन झाल्यापासुन सांगली व मिरजेच्या तुलनेत कुपवाडचा अद्याप म्हणावा तितका विकास झाला नाही. कुपवाड शहरात एकही बगीचा नाही. अद्यावत बागबगीचा व्हाव्यात, अशी कुपवाडकरांची अनेक वर्षापासून मागणी आहे, याचा विचार करून पालकमंत्री जयंत पाटील यांनी सोमवारी सायंकाळी अचानक कुपवाड दौरा करून प्रभाग आठ, एक व दोनमधील उद्यानासाठी चांगल्या जागा मिळाव्यात, यासाठी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. यामध्ये कुपवाडच्या प्रभाग आठमधील विद्यानगर गल्ली नंबर एक येथील खुली जागा, शहरातील उल्हासनगर (महावीर व्यायाम शाळा परिसर), एकता कॉलनी व कापसे प्लॉट येथील रत्नप्रभा सोसायटी आदी चार ठिकाणी खुल्या जागांची पाहणी करण्यात आली. लवकरच या जागेवर अद्यावत बागबगीचा डेव्हलप करून कुपवाडकरांचे स्वप्न पूर्ण करू, अशी ग्वाही यावेळी बोलताना पालकमंत्र्यांनी दिली.
यावेळी आयुक्त नितीन कापडणीस, उपमहापौर उमेश पाटील, विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, गटनेते मैनुद्दीन बागवान, नगरसेवक विष्णु माने, शेखर माने, शेडजी मोहिते, पद्माकर जगदाळे, सुनील भोसले, मधुकर पाटील,सागर खोत यांसह मनपातील आधिकारी व राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.