हल्लेखोर चुलतभावाचा पोलिसांना गुंगाराच
प्रतिनिधी / नागठाणे
जमिनीच्या वादातून निसराळे ता.सातारा येथे सख्ख्या भावांवर चाकूहल्ला करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री उशिरा पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.पाच हल्लेखोरांपैकी चौघा हल्लेखोरांच्या तातडीने मुसक्या आवळण्यात बोरगाव पोलिसांना यश आले आहे.
सोन्या उर्फ विजय संजय कदम वय .२१,रा.दत्तनगर, कोडोली, ता.सातारा ,शुभम बाबू जाधव वय.२० ,रा. कोडोली, ता. सातारा, किरण अंकुश रुईघरे (वय.२१,रा.दत्तनगर, कोडोली, ता. सातारा व प्रशांत काशीनाथ सोनटक्के (वय.२३) अशी पोलिसांनी अटक केल्याची नावे असून चौघांनाही चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. तर पाचवा संशयित चुलतभाऊ कैलास नेताजी घोरपडे हा अद्याप गुंगारा देत आहे.
शनिवारी दुपारी जमिनीच्या वादातून चुलत भाऊ कैलास नेताजी घोरपडे, त्याचा नातेवाईक सोन्या उर्फ विजय कदम यांनी निसराळे गावातील मुख्य रस्त्यातच सचिन साहेबराव घोरपडे व सोमनाथ साहेबराव घोरपडे या सख्या भावांवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात दोघांच्याही पोटात, छातीवर व पाठीवर गंभीर वार चाकूने करण्यात आले होते. यावेळी सोन्या उर्फ विजय कदम याच्या शुभम जाधव, किरण रुईघरे व प्रशांत सोनटक्के या साथीदारांनीही लाकडी दांडक्यांच्या साहाय्याने त्यांना मारहाण केली.
या मारामारीदरम्यानच बोरगाव पोलीस ठाण्याचे सपोनि डॉ. सागर वाघ व कर्मचारी घटनास्थळी पोहचले. पोलिसांना पाहताच हल्लेखोर पळून जाऊ लागले. यावेळी पोलीस हवालदार बाबा महाडिक, प्रशांत मोरे व सत्यम थोरात यांनी पाठलाग करून प्रशांत सोनटक्के व शुभम जाधव या हल्लेखोरांना पकडले. तर रात्री उशिरा पोलिसांनी सोन्या उर्फ विजय कदम व किरण रुईघरे यांना अटक केली.तर चुलत भाऊ कैलास नेताजी घोरपडे (रा.निसराळे,ता.सातारा) हा अद्याप पोलिसांना गुंगारा देत आहे.या घटनेची फिर्याद सचिन साहेबराव घोरपडे (वय.३५,रा.निसराळे,ता.सातारा) यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात दिली.रविवारी चारही संशयितांना जिल्हा न्यायालयासमोर हजर केले असता कोर्टाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.या गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि डॉ.सागर वाघ करत आहेत.