प्रतिनिधी / सातारा
पालिकेत आरोग्य विभागात भ्रष्टाचार मोठया प्रमाणात होत असल्याच्या तक्रारी होत होत्या. सोमवारी पालिकेचे उपमुख्याधिकारी संचित धुमाळ यांच्यासह आरोग्य निरीक्षक यांना पालिकेतच दुपारी 2 लाख 30 हजार रुपयांची लाच घेताना रंगे हाथ लाच लुचपथ विभागाने पकडले. लाचलुचपत विभागाने आरोग्य विभागाचे भ्रष्टाचाराचे कुरण उघडकीस आणले आहे. पालिकेच्या उपमुख्याधिकारी संचित धुमाळ यांच्यासह आरोग्य निरीक्षक यांच्यावर कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे. शेवटच्या बिलासाठी अडकवणूक केली जात होती. उपमुख्याधिकारी संचित धुमाळ यांना ताब्यात घेऊन सायंकाळी उशीरापर्यंत चौकशी सुरू होती. त्यांच्यावर सायंकाळी उशीरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.
याबाबत लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के यांनी दिलेल्या माहितीनुसार सातारा शहरात कचरा गोळा करण्यासाठी नेमण्यात आलेल्या कंपनीला काम देण्यात आले होते. या कंपनीने केलेल्या कामाचे शेवटच्या महिन्याचे 15 लाखाचे बिल राहिले होते. ते बिल देण्यासाठी पालिकेचे उपमुख्याधिकारी संचित धुमाळ यांच्यासह आरोग्य निरीक्षकांनी 2 लाख 30 हजार रुपयांची मागणी केली होती. मागणी करताच संबंधित तक्रारदारांनी आमच्याकडे तक्रार केली. तक्रारीनुसार पैसे घेवून आज दुपारी पालिकेत उपमुख्याधिकारी संचित धुमाळ यांच्या कार्यालयात पैसे देण्यासाठी गेले.त्यावेळी संचित धुमाळ यांच्यासह आरोग्य निरीक्षक प्रवीण यादव, गणेश टोपे हेही होते.
त्या दोघांसह संचित धुमाळ यांना रंगेहात ताब्यात घेतले. त्यांच्यावर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. उपमुख्याधिकारी संचित कृष्णा धुमाळ (वय 33, सध्या रा. केसरकर पेठ, मुळ रा. धायरी पुणे), आरोग्य निरीक्षक गणेश दत्तात्रय टोपे (वय 43, रा. यादोगोपाळ पेठ, सातारा), प्रवीण एकनाथ यादव (वय 51, रा. धादमे कॉलनी,करंजे सातारा) यांना ताब्यात घेवून त्यांची चौकशी सुरु आहे, असेही त्यांनी सांगितले.