पाटण तालुक्यातील ‘उरुल’ येथील घटना
प्रतिनिधी/नवारस्ता
पाटण तालुक्यातील उरुल येथील ‘गुरवकी’ नावाच्या शेतात बंदुकीच्या साह्याने मोराच्या शिकारी केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आलीय. आरोपी विनायक बाळासो निकम आणि राहुल बाळासो निकम (दोघेही रा. उरुल) असे या दोघांची नावे आहेत. काल, शनिवारी (दि.11) ही घटना घडली. या घटनेमुळे ऐन लॉकडाऊन काळात खळबळ उडाली आहे.
याबाबत वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, काल, शनिवारी (दि११) रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास मौजे उरुल येथील ‘गुरवकी’ नावाच्या मालकी क्षेत्रात मोर(लांडोर) या राष्ट्रीय पक्षाची शिकार झाल्याची माहिती वन विभागाला समजली. ही माहिती मिळताच मल्हारपेठ वन विभागाचे वनपाल संजयकुमार भाट, वनरक्षक रामदास धावटे, तसेच बहुले वन विभागाचे वनरक्षक दादासाहेब बर्गे यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी आरोपी विनायक निकम यांच्या मालकीच्या शेतातील पत्र्याच्या शेडजवळ मृत मोर (लांडोर) आणि शेजारी डबल बार बंदूक, टिव्हिएस ज्युपिटर पांढऱ्या रंगाची स्कुटर आणि आढळून आले. वरील दोन्ही आरोपींवर मोर या राष्ट्रीय पक्षाची शिकार केल्याप्रकरणी भारतीय वन्यजीव(संरक्षण) अधिनियम १९७२ चे कलमान्वये वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान या गुन्हेकामी उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा, सहाययक वन संरक्षक किरण कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पाटणचे वनक्षेत्रपाल विलास काळे वनरक्षक विलास वाघमारे यांनी आरोपींना ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे. दरम्यान या घटनेमुळे पक्षीप्रेमी मधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.