वार्ताहर/ सावंतवाडी
‘कोरोना’च्या संकटकाळात पुणे येथे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे कोरोनाची भीती प्रत्येकाच्या मनात आहे. या कठीण प्रसंगात तेथील जहांगिर हॉस्पिटलमध्ये ‘कोरोना’ रुग्णांच्या सिटीस्कॅनची जाबाबदारी सावंतवाडी तालुक्यातील सातुळी येथील दीपेश गजानन परब सांभाळतात. ‘कोरोना’ संसर्ग काळात हे काम जिकिरीचे आहे. पण संकटकाळात काम करायला मिळणे हेदेखील महत्वाचे आहे., असे ते सांगतात.
पुणे येथील जहांगिर हॉस्पिटलमध्ये दीपेशच्या वडिलांनी गेली 32 वर्षे सेवा केली. त्यामुळे दीपेश यांचे बालपण व संपूर्ण शिक्षण पुण्यातच झाले. पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण करून त्यांनी ‘डिप्लोमा इन मेडिकल रेडिओ टेक्नॉलॉजी’ हा कोर्स पूर्ण केला. सीएमसी चेन्नई येथे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर गेल्या काही वर्षापासून जहांगिर हॉस्पिटलमध्ये सिटीस्पॅन विभागात सिनिअर तंत्रज्ञान म्हणून ते कार्यरत आहेत. धाप लागणे, दम लागणे अशा रुग्णांचे प्रथम सिटिस्पॅन व एक्सरे काढले जातात. असे रुग्ण पॉझिटिव्ह आढळत आहेत. पेशंट इमर्जन्सी वॉर्डमध्ये दाखल केल्यानंतर आम्ही एक्स-रे व सिटीस्पॅन करतो. या हॉस्पिटलमध्ये शेकडोंच्या जवळपास रुग्णांची एक्स-रे व सिटीस्पॅन दररोज होतात. कधी पीपीई किट घातल्याशिवाय काम करावे लागते. कधीकधी निगेटिव्ह असलेल्या रुग्णांची तपासणी करतो. परंतु नंतर ते पॉझिटिव्ह आढळतात. एक्सरे व सिटीस्पॅनच्या आधारे डॉक्टरांना पॉझिटिव्हची लक्षणे दिसतात.
गेली अडीच महिने मी माझ्या कुटुंबासमवेत राहत नाही हॉस्पिटलमध्ये दोन दिवस डय़ुटी केल्यानंतर सुट्टी दिली जाते. हॉस्पिटलमधून बाहेर पडताना आंघोळ करूनच घरी जातो. घरीही माझी खोली वेगळी आहे. मी कुटुंबाच्या संपर्कात राहत नाही. हॉस्पिटलमध्ये आठवडय़ाला हायड्रोसिक्लोरीन टॅब्लेट कर्मचाऱयांना दिल्या जातात. हॉस्पिटल प्रशासनही आमची काळजी घेत आहे. ‘कोरोना’मुळे माणसे घाबरत आहेत. परंतु हॉस्पिटलमध्ये येणाऱया रुग्णांना आनंद देण्यासाठी मत्यांच्याशी संवाद साधत आशावाद देणे महत्वाचे आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांजवळ कोणी नातेवाईक फिरकत नाहीत. अशावेळी हॉस्पिटलमधील कर्मचारी, डॉक्टर, नर्स हेच त्यांचे आधार ठरत आहे हेच काम मी सामाजिक भावनेतून करत आहे. रुग्णांची सेवा हेच आमचे कर्तव्य आहे आणि तशी शिकवण आम्हाला दिली जात आहे, असे दीपश यांनी सांगितले. परब यांच्या पत्नी चौकुळ येथील असून त्या पुण्यामध्ये रिसर्च डेव्हलपमेंट विभागात काम करतात.