वृत्तसंस्था/ बॅसेल
भारताच्या किदाम्बी श्रीकांतने स्विस ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसऱया फेरीत स्थान मिळविताना डेन्मार्कच्या ख्रिस्तोफर्सेनला पराभवाचा धक्का दिला. पुरुष दुहेरीत सात्विकसाईराज व चिराग शेट्टी यांनीही विजयी सलामी देत दुसरी फेरी गाठली. मात्र महिला एकेरीत मालविका बनसोडचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले.
श्रीकांतने ख्रिस्तोफर्सेनचा 21-16, 21-17 असा केवळ 32 मिनिटांत पराभव केला. महिला एकेरीत मालविका बनसोडला मात्र पराभवाला सामोरे जावे लागले. तिला फ्रान्सच्या कि झुफेईने 21-16, 21-17 असे नमविले. पुरुष दुहेरीत सात्विकसाईराज व चिराग शेट्टी यांनी इंडोनेशियाच्या मोहम्मद शोहिबुल फिकरी व बगास मौलाना यांच्यावर 57 मिनिटांच्या खेळात 17-21, 21-11, 21-18 अशी मात केली. पहिला गेम गमविल्यानंतरही सात्विक-चिराग यांनी नंतरच्या दोन गेममध्ये मुसंडी मारत विजय साकार केला.
मिश्र दुहेरीत भारताच्या बी. सुमीत रेड्डी व अश्विनी पोनप्पा यांना फ्रान्सच्या पाचव्या मानांकित थॉम गिकेल व डेल्फिन डेलरू यांच्याकडून 13-21, 9-21 असा पराभव स्वीकारावा लागला. याशिवाय आकर्षी कश्यपला एकेरीत जर्मनीच्या वायव्होन ली कडून 5-21, 17-21 असा पराभव पत्करावा लागला.