वृत्त संस्था/ कतार
आगामी येथे होणाऱया एएफसी चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेसाठी सहभागी झालेल्या सर्व संघातील फुटबॉलपटूंची शनिवारी कोरोना चांचणी घेण्यात आली. या चांचणीमध्ये सात फुटबॉलपटू पॉझिटिव्ह असल्याची माहिती आशियाई फुटबॉल नियंत्रण समितीने दिली आहे.
या स्पर्धेत सहभागी होणाऱया सौधी अरेबियाच्या अल हिलाई संघातील पाच फुटबॉलपटू आणि प्रशिक्षक वर्गातील एका व्यक्तीला त्याचप्रमाणे कतारच्या अल दुहेली संघातील एका व्यक्तीला कोरोनाची बाधा झाल्याचे चांचणीत आढळून आले आहे. कोरोना महामारीमुळे आशिया खंडातील इलाईट क्लबस्तरीय एएफसी चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धा मार्च महिन्यात तहकूब करण्यात आली होती. आता ती कतारमध्ये येत्या सोमवारपासून पुन्हा खेळविली जाणार आहे. त्याचप्रमाणे इस्ट आशिया फुटबॉल स्पर्धा मलेशियात 16 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. चालू वर्षांतील एएफसी चषक, आशियातील सेकंड टियर क्लबस्तरीय फुटबॉल स्पर्धा कोव्हिड-19 समस्येमुळे रद्द करण्यात आली आहे.