पाचांच्या लवकरच मानवी चाचण्या, प्राथमिक यशामुळे आत्मविश्वास द्विगुणित, कठोर निकषांनंतरच मान्यता
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताच्या सात कंपन्यांनी कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी लस शोधण्याच्या जागतिक स्पर्धेत आघाडी घेतली आहे. येत्या काही महिन्यांमध्ये व्यवहारी पातळीवर लस तयार करणे आणि तिचे उत्पादन करणे हे दोन्ही महत्वाचे टप्पे पार केले जातील, अशी शक्यता विविध कंपन्यांनी व्यक्त केली आहे.
भारत बायोटेक, सिरम इन्स्टिटय़ूट, झायडन कॅडिला, पानासिया बायोटेक, इंडियन इम्युनोलॉजिकल्स, मिनव्हॅक्स व बॉयोलॉजिकल ई या त्या सात कंपन्या आहेत. सर्वसाधारणपणे एक लस तयार होऊन तिचे मोठय़ा प्रमाणावर उत्पादन करण्याची क्षमता प्राप्त होण्यास 6 ते 12 वर्षे लागतात. तथापि, कोरोनाविरूद्धच्या लस निर्मितीत एकच वेळी जगभरातील असंख्य खासगी व सरकारी कंपन्या जोरदार प्रयत्न करीत असल्याने ही लस अल्प वेळेत उपलब्ध होणे शक्य आहे.
प्रथम अनुमती भारत बायोटेकला
भारत बायोटेक या सरकारी कंपनीला सर्वप्रथम कोरोना लसीची मानवी चाचणी करण्यास अनुमती मिळाली. दुसऱया व तिसऱया मानव चाचणी टप्प्यातील प्रयोग आता ही कंपनी करीत आहे. या कंपनीच्या लसीचे ‘कोव्हॅक्सिन’ असे नामकरण करण्यात आले आहे. पुण्यातील सिरम या प्रसिद्ध कंपनीने या वर्षाच्या अखेरीपर्यंत लसीचे उत्पादन करण्यात यश येईल असे प्रतिपादन केले आहे.
सिरम कंपनी ब्रिटनमध्ये तयार केलेल्या ऍस्ट्राझेनेसा या लसीचे उत्पादन करण्याची योजना आखत आहे. या लसीची सध्या तिसऱया टप्प्यातील मानवी चाचणी केली जात आहे. याच लसीवर भारतातही येत्या ऑगस्ट महिन्यापासून मानवी परीक्षण केले जाणार आहे.
अमेरिकेच्या सहकार्याने…
सिरम कंपनी अमेरिकेच्या कोडॅजेनिक्स या कंपनीच्या सहकार्याने आाणखी एक लस तयार करण्याच्या प्रयत्नात आहे. या लसीवरही अमेरिकेत मानवी चाचणी सुरू आहे. या चाचणीचे परिणाम सकारात्मक असल्यास तिचे त्वरित उत्पादन सुरू होऊ शकते, अशी माहिती कंपनीचे कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला म्हणाले. या कंपनीने जगातील इतर अनेक कंपन्यांशी संधान बांधले असून एकाचवेळी अनेक लसी निर्माण करण्याच्या दिशेने वाटचाल चालविली आहे. सर्व लसींनी प्राथमिक टप्पा यशस्वीरित्या ओलांडला असून आता पुढच्या टप्प्यांची प्रतीक्षा आहे.
ऑस्ट्रेलियाशी संधान
इंडियन इम्युनॉलॉजिकल्स या कंपनीने ऑस्ट्रेलियाच्या ग्रिफिथ विद्यापीठाशी सहकार्य करार केला असून लस निर्मितीचे प्रयत्न भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशांमध्ये चालविले आहेत. इतरही कंपन्यांनी जोरदार प्रयत्न चालविले आहेत. त्यामुळे भारतीयांना येत्या सहा महिन्यांमध्ये शुभावार्ता मिळेल अशी आशा निर्माण झाली आहे. अर्थात, सर्व निकषांवर लस उतरल्यानंतरच तिला मान्यता मिळणार आहे. धीर धरणे आवश्यक आहे.
सात महिने लागणार
देशातील मोठी औषध कंपनी मानली गेलेल्या झायडस कॅडिला कंपनीच्या लसीवरही मानवी चाचणी सुरू झाली आहे. सर्व टप्प्यांमधील मानवी परीक्षणे पूर्ण होऊन लसीला मान्यता मिळण्यासाठी आणि उत्पादन सुरू करण्यासाठी अजून 7 महिन्यांचा अवधी लागणार आहे, असे या कंपनीच्या अधिकाऱयांचे म्हणणे आहे.
पानासियाची भागीदारी
पानासिया बायोटेक कंपनीने अमेरिकेच्या रेफाना या कंपनीशी भागीदारी करून आयर्लंड येथे प्रयोगशाळा स्थापन केली आहे. जूनच्या प्रारंभापासून या कंपनीने लस बनविण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. या कंपनीने लस निर्मितीत मोठी प्रगती केल्याचा दावा केला असून पुढील वर्षाच्या प्रारंभापर्यंत 50 कोटी डोसेस तयार करण्याची महत्वाकांक्षा बाळगली आहे. आपली लस सर्वसामान्यांना परवडणारी असेल असा या कंपनीचा दावा असून तो आशादायी आहे.