अमेझॉन प्राइम व्हिडिओची आगामी सीरिज ‘द फॅमिली मॅन 2’ प्रदर्शनापूर्वीच वादात सापडली आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री सामंथा अक्किनेनीच्या व्यक्तिरेखेवरून सोशल मीडियावर सुरू झालेला विरोध आता राजकीय क्षेत्रापर्यंत पोहोचला आहे. राज्यसभा खासदार वायको यांच्यानंतर आता तामिळनाडूच्या मंत्र्यानेही माहिती-प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहून सीरिजवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
वाढत्या विरोधानंतर सामंथाने याप्रकरणी विधान केले आहे. द फॅमिली मॅन सीरिजच्या युनिटवर मोठय़ा संख्येत तमिळ लोक आहेत. मी स्वतः हाफ तमिळ आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून आम्ही तमिळ संस्कृती आणि राजकारणाबद्दल पूर्णपणे जागरुक आहोत. तमिळ लोकांची खराब प्रतिमा आम्ही दर्शविणार नसल्याचे सामंथाने म्हटले आहे. या सीरिजमध्ये सामंथाची व्यक्तिरेखा दहशतवाद्याची असून तमिळ भाषेत बोलताना दाखविण्यात आली आहे.