क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
बेंगलोर एफसीने भारताचा युवा डिफेंडर सार्थक गोलूई याला दोन मोसमासाठी करारबद्ध केले आहे. 23 वर्षीय सार्थक आता बेंगलोर एफसी संघासाठी करार केलेला चौथा फुटबॉलपटू आहे. यापूर्वी बेंगलोर एफसीने मुसावू किंग, ऍलन कॉस्ता आणि रोहितकुमार यांना संघात आणले आहे.
कोलकातात जन्मलेला सार्थक गोलूई एआयएफएफच्या एलीट अकादमीत तयार झालेला फुटबॉलपटू असून आतापर्यंत तो एफसी पुणे सिटी, मुंबई सिटी एफसी आणि एससी ईस्ट बंगाल संघाला खेळला आहे. इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत तो आता बेंगलोर एफसीला खेळण्यापूर्वी 49 सामने खेळला आहे. भारतीय फुटबॉल संघाचे 16 आणि 19 वर्षीय संघातही तो खेळला असून 2018 मध्ये बांगलादेशात झालेल्या सॅफ अजिंक्यपद स्पर्धेत त्याने भारताच्या सीनियर फुटबॉल संघाचे प्रतिनिधित्व केले होते.
यंदाच्या मोसमात आपला संघ अधिक मजबूत करण्याच्या यत्नात 23 वर्षीय मीडफिल्डर बिद्यानंदा सिंगला एटीके मोहन बागान संघाने करारबद्ध केले आहे. गेल्या आयएसएल फुटबॉल मोसमात बिद्यानंदा सिंग जेतेपद मिळविलेल्या मुंबई सिटी एफसी संघात होता, मात्र त्याला एकाही सामन्यात खेळविण्यात आले नाही. 2019-20 बिद्यानंदा सिंग मुंबई सिटी एफसीसाठी 10 सामन्यांत खेळला आणि एक गोलही केला. मागील मोसमात मात्र त्याला एकही सामना मिळाला नाही. बिद्यानंदा सिंग, लिस्टन कुलासो, अमरिंदर सिंग, जोनी कौको, दीपक टांग्री, आशुतोष मेहता आणि हय़ुगो बूमोस हे फुटबॉलपटू आता एटीके मोहन बागानला करारबद्ध झाले आहेत.