बापट गल्ली येथे बैठक : आज देणार निवेदन
प्रतिनिधी/ बेळगाव
सावकारी व्याजामुळे बापट गल्ली येथील एका तरुणाने आत्महत्या केली होती. या घटनेनंतर बापट गल्लीसह शहरामध्ये मोठी खळबळ उडाली. सावकारी व्याजाखाली अनेक जण अडकल्याचे आढळून आले. त्यामुळे तातडीने बापट गल्ली येथील नवहिंद युवक मंडळ, कालिकादेवी युवक मंडळ, महिला मंडळ आणि पंच मंडळींनी बैठक घेऊन कुणीही अशा प्रकारे कर्ज घेतले असेल तर घाबरू नये, कोणत्याही परिस्थितीत आत्महत्या करू नये, असे आवाहन बैठकीत करण्यात आले.
विजय मनोहर गवाणे (वय 35, रा. बापट गल्ली) या युवकाने सावकारी जाचाला कंटाळून आपले जीवन संपविले. या प्रकरणी बंडू केरवाडकर (रा. वडगाव) याच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आता बंडू केरवाडकर याने अनेकांना कर्ज देऊन मनमानीपणे व्याज आकारल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे बापट गल्लीसह सर्व परिसर एकवटला असून कोणत्याही परिस्थितीत अशा सावकारांना घाबरू नका, असे कळविण्यात आले आहे.
ज्या युवकांनी, व्यापाऱयांनी किंवा इतर अडचणीत असलेल्या नागरिकांनी 10 टक्के व्याजदराने कर्ज घेतले असेल त्यांनी पुढे येऊन तक्रारी द्याव्यात, असे आवाहन करण्यात आले. याबाबत बुधवार दि. 11 रोजी जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात येणार असून सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या बैठकीला बापट गल्ली परिसरातील नागरिकांसह गवाणे कुटुंबीय आणि व्यापारी बंधू उपस्थित होते.